जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
By admin | Published: June 10, 2017 02:00 AM2017-06-10T02:00:56+5:302017-06-10T02:00:56+5:30
पुणे जिल्ह्यात लोणावळा, मावळ, दौंड तालुक्यात पावसाने आज दमदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात लोणावळा, मावळ, दौंड तालुक्यात पावसाने आज दमदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
लोणावळा शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची रिपरिप सुरू होती. मावळ तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
काही दिवसांपासून लोणावळा परिसरात सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग दाटून पावसाचा शिडकाव होत होता. शुक्रवारी सकाळपासूनच लोणावळ्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्या ढगांची हवेत दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली. लोणावळा शहरासह परिसरातील वाकसई, वरसोली, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, देवघर, कार्ला, पाटण, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे या सर्व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. भातरोपांची पेरणी झाली असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत असताना झालेले मॉन्सूनचे आगमन हे सुखकारक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
यवत परिसरात आज (दि. ९) दुपारच्या सुमारास वरुणराजाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. दुपारच्या सुमारास पावसाच्या मध्यम सरी पडल्या, यामुळे मॉन्सूनचे आगमन झाल्याची चाहूल लागली आहे. आज यवतच्या आठवडेबाजारात सकाळपासूनच चांगली रेलचेल असल्याचे दिसत होते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मागील शुक्रवारी आठवडेबाजार पूर्णपणे बंद होता. मात्र आज सकाळपासून बाजार चांगला भरला होता.
दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने बाजारकरू मंडळींची चांगलीच धांदल उडाली. प्रचंड उकाड्यानंतर पावसाने वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला होता. पावसाचे वेळेत आगमन झाल्याने सर्वांनाच आजचा पाऊस हवाहवासा वाटला.