पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: June 27, 2023 02:44 PM2023-06-27T14:44:35+5:302023-06-27T14:45:41+5:30
हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्याने घाट परिसरात जाताना नागरिकांनी सावध राहावे
पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने पुणे शहर व घाट माथ्यावर पावसाने हजेरी लावली आहे. येत्या २४ तासांमध्ये पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारपासून घाट माथ्यावर चांगलाच पाऊस होत असल्याने धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण फिरायला ताम्हिणी घाट, लोणावळा आदी परिसरात जातात. त्यामुळे तिथे गर्दी होते. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही केले आहे. पुण्यातही पावसाची रिमझिम सुरू आहे. सोमवारी शहरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर ७ मिमी, वडगावशेरी ७.५ मिमी, कोरेगाव पार्क ५ मिमी, एनडीए ३.५ मिमी, मगरपट्टा ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
घाट माथ्यावरील पाऊस
लोणावळा : ८२ मिमी
शिरगाव : ७५ मिमी
अंबोने : ९१ मिमी
कोयना ५४ मिमी
ताम्हिणी : ८६ मिमी