शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:53+5:302021-04-28T04:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरात गारवा जाणवू लागला आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट तसेच हलका पाऊस झाला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील रात्रीच्या तापमानात वाढ झाली होती, तर दिवसाचे कमाल तापमानही सरासरीच्या तुलनेत अधिक होते.
सकाळपासूनच आकाश अंशत: ढगाळ होते. दुपारनंतर आकाश ढग दाटून आले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह सायंकाळी शहराच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.
बाणेर, औंघ, आकुर्डी, पाषाण, सूस रोड, नवी सांगवी परिसरात गारांचा वर्षाव झाला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २.३ मिमी आणि पाषाण येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली होती.
शहरात पुढील ६ दिवस ३ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.