Pune: शहरातील ओढे, झरे बंद केले तर पाण्याने जायचे कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:07 AM2022-09-14T10:07:17+5:302022-09-14T10:09:07+5:30
महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे...
- श्रीकिशन काळे
पुणे : शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरते आणि रस्तेही पाण्याखाली जातात. त्यात प्रचंड नुकसान होते. शहरात सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पावसाच्या पाण्याला वाहण्यासाठी असणारे मार्ग, झरे, ओढे, नाले बंद झाले आहेत. काही बुजविले आहेत. त्यामुळे पाण्याला भूगर्भात जाण्यासाठी पर्यायच राहिला नाही. परिणामी, रस्त्यावर पाणी येत असून, त्यामुळेच पूरस्थिती निर्माण होत आहे. महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केली.
शहरात आता दरवर्षी पावसाळ्यात शहरात कुठे ना कुठे पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पाणलोट क्षेत्रात पडणारे पाणी हे अडविणे, जिरवणे आवश्यक असते. त्यातील काही पाणी वाहून जाते. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यापैकी ५ टक्के पाणी जमिनीत जिरत असते. जर तिथे तशी परिस्थिती असेल तरच ते जिरते, अन्यथा ते पाणी वाहून जाते. दुसरीकडे धरणे, बंधारे बांधून पाणी अडविले जाते. इतर जे पाणी आहे त्याला वाहायला रस्ता हवा असतो. नदी, ओहोळ, ओढा, झरे यातून पाणी वाहत असते. पण, हे मार्ग गेल्या काही वर्षांत बुजविले गेले आहेत. म्हणून पावसाचे पाणी रस्त्यावरच येत आहे. पाण्याला नैसर्गिक मार्ग राहिले नसल्याने पाण्याची पातळी वाढून रस्ते पाण्याखाली जात आहेत. हे आता सातत्याने होणार आहे. कारण शहरीकरणामुळे आपण पाण्याचे अनेक मार्ग बंद केले आहेत.
पुणे हे चढ-उतारावर वसलेले शहर आहे. इथे तलाव, नदी, ओढे, झरे आहेत. पण, त्यांची रचना शहरीकरणामुळे बदलली आहे. पुण्याच्या माथ्यावर म्हणजे पानशेत, मावळ, मुळशी या परिसरात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार मिमी पाऊस पडतो. माथ्यावरून येणारे पाणी शहराकडेच येते आणि शहरात दरवर्षी साधारणपणे ८०० मिमी पाऊस पडतो. ही गोष्ट कोणी विचारातच घेत नाही, असे धोंडे यांनी सांगितले.
यावर उपाय काय?
प्रशासन व समाज संवेदनशील असायला हवा, जो आता नाही. दोघांची संवेदनशीलता परत आणायला हवी. जे आता नदीविषयी जागरूक आहेत, त्या संवेदनशील लोकांनी एक दबाव गट तयार करावा. जो पाण्याचे नैसर्गिक अस्तित्व जपेल. शहरातील नैसर्गिक स्रोत पुन्हा जीवंत केले पाहिजेत.
खूप वर्षांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर इमारती नव्हत्या. तेव्हा शहरभर ठिकठिकाणी २५६ झरे होते. आता मात्र ५६ देखील जीवंत राहिले नाहीत. सर्व गायब झाले आहेत. या झऱ्यांत जाणारे पाणी रस्त्यावरच राहत आहे. हे सर्व झरे पुनर्जीवित केले पाहिजेत.
- उपेंद्र धोंडे, भूजलवैज्ञानिक