Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:49 PM2024-07-25T12:49:26+5:302024-07-25T12:49:39+5:30
लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे
आळंदी : इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला असून भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात गेले आहे. अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. यापार्श्वभूमीवर गुरूवारी (दि.२५) आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल व सिद्धबेट परिसरातील नवीन पूल असे तीन पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र बुधवारी (२४) सकाळपासून ही पाणीपातळी अधिकच वाढली होती. त्यानंतर सायंकाळी व रात्रीभर पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या प्रवाहातदेखील मोठ्या गतीने वाढ झाली. पाण्याच्या प्रवाहाने इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. दरम्यान लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी नदीने रुद्रावतार धारण केला आहे. तत्पूर्वी इंद्रायणी घाटावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान गुरुवारी सकाळी इंद्रायणी नदीचे पाणी पुलांवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस व नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील जुना पूल, चाकण चौकातील मुख्य पूल व सिद्धबेट लगतचा पूल दळणवळणासाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याला बॅरिकेट लावून सील करण्यात आला आहे. शहराकडे येणारी व पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या पुलाशेजारील नवीन पुलाच्या रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून सद्यस्थितीत दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर इंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने इंद्रायणी घाट परिसरात आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत. तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापूराकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे व वरीष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके यांनी केले आहे.