पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! रात्रीपासून चांगलाच बरसतोय, जिल्ह्यांतही पावसाची हजेरी
By श्रीकिशन काळे | Published: September 2, 2023 10:26 AM2023-09-02T10:26:01+5:302023-09-02T10:26:32+5:30
मगरपट्टा येथे शहरातील सर्वाधिक ५४ मिमी पावसाची नोंद आज सकाळी ९ पर्यंत झाली आहे.
श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्रीपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यंदाच्या हंगामातील हा जोरदार म्हणावा असा पाऊस होत आहे. हा केवळ पुण्यातच नव्हे तर कोकण व जिल्ह्यात देखील होत आहे. मगरपट्टा येथे शहरातील सर्वाधिक ५४ मिमी पावसाची नोंद आज सकाळपर्यंत झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने २ सप्टेंबरनंतर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यांचा अंदाज खरा ठरला असून शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे, ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत पुण्यात १९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मगरपट्टा येथे ५४ मिमी पाऊस झाल्याची आकडेवारी हवामानशास्त्र विभागाने नोंदवली आहे.
बारामती परिसरात देखील चांगला पाऊस होत आहे. यंदा आतापर्यंत बारामतीला चांगला पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. तसेच चिंचवडला सर्वाधिक ८३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे शहरातील आकाश ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून सकाळी ९ पर्यंतचा पाऊस
शिवाजीनगर: १९.६
पाषाण : १२.२
लोहगाव : ३१.८
चिंचवड : ८३.५
मगरपट्टा : ५४.०
बारामती : ३५.२