पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:53 AM2024-06-13T11:53:04+5:302024-06-13T11:55:13+5:30

एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले? दुकानदारांचा सवाल

heavy rain in pune Why should we be punished for the mistakes of the pune municipal corporation Question of shopkeepers | पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

धायरी: चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथील २२ दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी, विद्यमान आमदार, खासदार यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी देखील केली. मात्र महापालिकेच्या चुकीमुळे आम्हा दुकानदारांचे झालेले नुकसान कोण भरून देणार, हा सवाल येथील व्यावसायिक करीत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील फनटाईम थिएटरपासून ते माणिकबागपर्यंत मुख्य रस्त्यावरून येणारे पावसाचे पाणी हे ब्रह्मा हॉटेलसमोरील उतारावर असलेल्या लेनमध्ये शिरते. त्याचबरोबर परिसरातील चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हा प्रकार घडल्याचे व्यावसायिकांची म्हणणे आहे. आनंदनगर चौक, माणिकबाग, विश्रांतीनगर आदी ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने वाहतुकीची गंभीर स्थिती निर्माण झाली. चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे येथील व्यवसायिकांची म्हणणे आहे. तसेच धायरी येथील सावित्री गार्डन नाला, रायकर मळा नाला, अभिरुची नाला, माणिकबाग नाला, वडगाव -आंबेगाव हद्दीवरीवल धबाडी नाला, वडगाव बुद्रुक नाला आदी ओढे व नाल्यांचे पाणी सोसायट्या, लोकवस्त्यांत, तसेच मुख्य रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. सिंहगड रस्त्यासह त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साठत आहेत.

एक कोटीहून अधिक रुपयांचे टेंडर; तरीही पावसाचे पाणी रस्त्यावर...

सिंहगड रस्ता परिसरातील नाला सफाई कितपत केली याबद्दल नागरिकांच्या मनात साशंकता आहे. नागरिकांच्या कररुपी पैशांची नुसती उधळपट्टी सुरू असून एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले, हा खरा प्रश्न आहे. या ठेकेदारसोबत कोण कोण अधिकारी सामील आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नालेसफाईचे काम पूर्ण केले म्हणणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे. - प्रसन्न जगताप, माजी उपमहापौर
 
आमच्या लेनमध्ये २२ व्यावसायिकांची दुकाने आहेत. सर्व दुकानांत किमान चार फूट पाणी होते. माझा टेलरिंग व्यवसाय असल्याने ग्राहकांचे नवीन कपडे, इन्व्हर्टर, फर्निचर आदी वस्तू सर्व खराब झाल्या. महापालिकेच्या एका चुकीमुळे आम्हा व्यवसायिकांचे विनाकारण आर्थिक नुकसान झाले याची भरपाई कोण देणार? - उत्तम दबडे, टेलर व्यावसायिक, माणिकबाग

Web Title: heavy rain in pune Why should we be punished for the mistakes of the pune municipal corporation Question of shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.