Pune Rain: शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:13 PM2024-08-04T15:13:57+5:302024-08-04T17:21:49+5:30
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे
शिक्रापूर : पाबळ ता. शिरूर सह वेळनदी भागातील खेड व आंबेगाव मधील गावांमध्ये गेली आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला असून रविवारी दुपारी एक वाजता सांडव्यातून वेळ नदीत पुढे पाणी सुरू झाले. बंधारा भरल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी काहीसा कमी प्रमाणात पाणीसाठा असलेला हा बंधारा उन्हाळ्यात कोरडा पडला होता. भीषण दुष्काळी परिस्थिती असलेल्या पाबळ, केंदूर, धामारी भागात गेले दोन महिने पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्याचबरोबर चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. गेले ८ दिवस पावसाने हजेरी लावल्याने या भागाला मोठा दिलासा मिळालाय. खैरेनगर, धामारी, पाबळ या भागात पिण्याच्या पाण्यासाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून अनेक योजना करण्यात आल्या आहेत. बंधारा कोरडा पडल्यानंतर सर्व योजना बंद पडल्या होत्या. त्याचबरोबर या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी आल्याने याभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून येत्या काळात या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका १२ गावांना बसतो. थिटेवाडी बंधाऱ्यात डिंभा किंवा चासकमानचे पाणी सोडण्यासाठी गेली अनेक वर्ष आंदोलने केली जात आहेत. परंतु पावसाळ्या नंतर ही आंदोलनाची धार कमी होते व पुन्हा बंधारा कोरडा पडला की आंदोलने सुरू होतात. सध्या बंधारा भरल्याने या भागात आनंदाचे वातावरण असून या भागातील पाणी प्रश्न काहीसा मार्गी लागणार आहॆ.