खेड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:49 PM2020-09-30T21:49:06+5:302020-09-30T21:49:17+5:30
प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी..
राजगुरूनगर : पुर्व भागात दावडी या परिससरात आज (दि ३० ) दुपारी ५ वाजता जोरदार पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. नुकताच कांदा लागवड केलेल्या कांदापिकांना या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. त्याचबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दावडी गावात पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दावडी परिसरातील जाधवदरा, बोञेवस्ती, होरे वस्ती, म्हसाडेवस्ती, कान्हुरकरमळा या भागात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सुमारे एक तास पडत असलेल्या पावसाने शेतातील कांदा पिक वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारबंळ उडाली. त्याचबरोबर शेतात पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
ओढे नाल्यांना पहिल्यांदाच पुर आला. नवीन पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांची गैरसोय टळली. दावडी परिसरात गेल्या काही वर्षात पहिल्यादांच असा पाऊस झाले असल्याचे जाणकार ग्रामस्थांनी मत व्यक्त केले, असे जाधवदरा येथील शेतकरी आबासाहेब घारे , दावडी गावचे माजी सरपंच सुरेश डुंबरे यांनी सांगितले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी, कांदा लागवड करावी लागणार आहे. प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.