पुण्यात पुन्हा जोरदार पाऊस; अनेक रस्ते जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:24 PM2019-09-25T23:24:55+5:302019-09-25T23:27:13+5:30
रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असून आजही रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
आज रात्री 8 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की वाहनचालकांना समोरचे दिसणेदेखील कठीण झाले होते. अनेक रस्ते जलमय झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वारजे उड्डाणपुलाखाली अनेक वाहने बंद पडली. सिंहगड रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी पाणी साचले. पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. बिबवेवाडी, धायरी भागत अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले.
नवीन कात्रज घाटाजवळ शेजारी बोगद्याजवळ रस्ता पावसामुळे बंद झाला आहे. रस्त्यावर दरड कोसळली आहे. कात्रजला दोन तासात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अजूनही शहरात पावसाचा जोर कायम आहे.