पुण्यात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता; राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:35 AM2022-09-07T10:35:47+5:302022-09-07T10:36:02+5:30
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. येत्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशीही शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टाही त्याच्या समान्य स्थितीत आहे. परिणामी, चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात बुधवारपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे.
या स्थितीमुळे राज्यातील सर्वच भागात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे काश्यपी यांनी सांगितले. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ही स्थिती शुक्रवारपासून १२ तारखेपर्यंत कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. घाट परिसरात मात्र, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला.
पुण्यात पाऊस वाढणार
- शहरात मंगळवारी दुपारी शिवाजीनगरसह पश्चिम उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने शिवाजीनगर येथे १५, पाषाण येथे ७.८ तर लोहगाव व चिंचवड येथे २ मिमी पावसाची नोंद केली. तसेच येत्या पाच दिवसांमध्ये शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात शुक्रवारी शहरात मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनावेळी भाविकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. याच दरम्यान धरणांच्या पाणलोटातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने विसर्जनावेळी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी केली आहे.
तारीख अलर्ट भाग
७ सप्टेंबर यलो उत्तर महाराष्ट्र, औरंगाबाद, जालना, पालघर ठाणे वगळता संपूर्ण राज्य
८ सप्टेंबर यलो उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे वगळता संपूर्ण राज्य
९ सप्टेंबर यलो उत्तर महाराष्ट्र, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली वगळता संपूर्ण राज्य
९ सप्टेंबर ऑरेंज चंद्रपूर, गडचिरोली
१० सप्टेंबर यलो कोकण मध्य महाराष्ट्र (उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता)