पुण्यातील काही भागांमध्ये ढगफुटी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 09:37 PM2018-06-08T21:37:10+5:302018-06-08T21:37:10+5:30
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
पुणे : एक दिवसाची विश्रांती घेणाऱ्या पावसानं शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून दिवे घाटात ढगफुटी झाली. घाटात डोंगरावरून पाणीच पाणी वाहत होते.
बुधवारी संध्याकाळीही असाच पाऊस झाला होता. त्यावेळी भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरात वेळूफाटा व खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला. तसंच पुरंदर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला होता. आज दिवसभर पावसाचे सावट होते. मात्र तो बरसला नव्हता. संध्याकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. खेड तालुक्यात सुमारे तासभर झालेल्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झाले.
बारामती शहर परिसरात दुपारी ४ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होता. आजच्या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, सराटी, भगतवाडी या निरा नदीच्या किनाऱ्याशेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज होती. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले होते. अखेर आज पाच वाजता या परिसरात चांगला पाऊस झाला. हवेंली तालुक्यातही सायंकाळी साडेसहा वाजता जोरदार पाऊस झाला.