दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस
By admin | Published: October 3, 2015 01:24 AM2015-10-03T01:24:28+5:302015-10-03T01:24:28+5:30
गणेशोत्सवानंतर वरुणराजाचे पुन्हा आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड, तसेच मावळ परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली
पिंपरी : गणेशोत्सवानंतर वरुणराजाचे पुन्हा आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड, तसेच मावळ परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणारा पवना नदीवरील साकव पूल पाण्याखाली गेला आहे, तर वीज पडून आर्डव गावातील मंदिराला तडे गेले. धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पवनेतील साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.
गणेशोत्सवाच्या प्रारंभी पावसाचे जोरदार आगमन झाले होते. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा ७५ टक्के झाला होता. गणेशोत्सवात पावसाचे आगमन झाल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले होते. पावसाने काही काळ उघडीप दिली होती. गणेश विसर्जनाच्या वेळीही पावसाने हुलकावणी दिली.
गुरुवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. शहर परिसरात सायंकाळी जोरदार हजेरी लावली. रात्री अकरापर्यंत अधून-मधून पाऊस पडत होता. शुक्रवार सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सकाळी दहानंतर आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. दुपारी अडीचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला.
भोसरी, चिखली, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मोरवाडी, शाहूनगर, चिंचवड स्टेशन,
पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, निगडी, प्राधिकरण, रावेत, किवळे, थेरगाव, वाकड, हिंजवडी, ताथवडे, तळवडे परिसरात सुमारे तासभर
पाऊस पडत होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)