पुण्यात पावसाला दमदार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 04:18 PM2018-06-21T16:18:18+5:302018-06-21T16:18:18+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांची गुरुवारची दुपार सुखद गेली. दुपारी 3 च्या सुमारास पुण्यात विजांच्या कडकडात दमदार पावसाला सुरुवात झाली.
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांची गुरुवारची दुपार सुखद गेली. दुपारी 3 च्या सुमारास पुण्यात विजांच्या कडकडात दमदार पावसाला सुरुवात झाली.
जूनचा महिना संपत अाला तरी पुण्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. दिवसभर कडक ऊन अाणि रात्रीच्या उकाड्याने पुणेकरांना हैरान केले हाेते. त्यातच पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती खालावली अाहे. शहराताल दाेन महिने पुरेल इतकाच पाणीसाठी या धरणांमध्ये अाहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट अाेढविण्याचे चित्र अाहे. परंतु अाज अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांमध्ये एक सकारात्मक उर्जा पाहायला मिळत अाहे.
पुणे शहराबराेबरच उपनगरातही पावसाने जाेरदार हजेरी लावली. अचानक अालेल्या पावसामुळे अनेकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. काही रस्तांवर माेठ्याप्रमाणावर पाणी साचले हाेते, तसेच अनेकांनी पावसापासून वाचण्यासाठी दुकानांचा अासरा घेतला. दुचाकी घसरुन पडण्याचे प्रकारही अनेक भागात घडले. अनेक ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या. सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक मंदावल्याचे चित्र हाेते. ६ जूनपासून महाराष्ट्र आणि गोव्यात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात अाली हाेती. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला हाेता. अखेर गुरुवारी पावसाला जाेरदार सुरुवात झाल्याने अखेर मान्सूनचा फिल पुणेकरांना अनुभवायला मिळाला.