'या' कारणामुळे पुण्यात पडतोय ढगफुटीसारखा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:14 AM2019-09-26T02:14:50+5:302019-09-26T02:16:12+5:30
रात्री मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची दैना
पुणे : दिवसा वाढलेले तापमान, त्यामुळे होणारे बाष्पीभवन आणि स्थानिक पातळीवर बदलले वातावरण यामुळे अचानक ढगांची निर्मिती होऊन सध्या जोरदार पाऊस होत आहे. अशा पावसाला ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ असे म्हटले जाते. स्थानिक वातावरणावरुन अशा ढगांची निर्मिती होत असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपि यांनी सांगितले. तसेच पुण्यात गुरूवारी आणि शुक्रवारी ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ म्हणजे वरच्या दिशेने जाणारा पाणीदार ढग असे होय. सध्या दोन वेगवेगळ्या सिस्टिम सुरु आहेत. पुणे शहरातील दिवसाच्या तापमान वाढ होत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढते. त्यातून ढग निर्माण होतात. या ढगाची उंची २ ते १५ किमी इतकी असू शकते. तसेच त्याची लांबी ५ ते १० किमी परिसरात इतकी असते. जमिनीवरील तापमान जास्त असल्याने खालून हवा वर जात असते. त्यामुळे हवेच्या दाबामुळे पाणीदार ढगाची निर्मिती होऊ लागते. सायंकाळनंतर तापमान कमी होते. त्यामुळे खालच्या स्तरावरील हवेचा दाब कमी होतो. तसेच पाणीदार ढगांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्प साठते की, त्यामुळे ते जड होऊ वेगाने खाली येतात आणि मोठ्या टपोऱ्या थेंबासारखा जोरदार पाऊस पडू लागतो. हा पाऊस अत्यंत कमी वेळेत मर्यादित भागात कोसळतो. अशा ढगातून जास्तीत जास्त २ तास पाऊस होतो. अशा ढगांची व्याती किती मोठी आहे, यावरुन त्यातून किती पाऊस पडू शकते, असे ठरते. काही वेळा अशा ढगांमुळे एका तासात १०० मिमी म्हणजेच ढगफुटीसारखे प्रकारही होण्याची शक्यता असते. गेले दोन दिवस याच ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळे पाऊस होत आहे.
शहरात बुधवारी दिवसभर उन्ह पडले होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत फक्त ०.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास गेल्या दोन दिवसांप्रमाणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अल्पावधीतच शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. कोथरुड, कर्वेनगर तसेच शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर पाणी साचले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री 9 ते 11. 30 पर्यंत कात्रज मध्ये 70 मिमी तर शिवाजीनगरला 43. 3 मिमी पाऊस झाला होता. मंगळवारी रात्री 3 तासात 54 मिमी पाऊस झाला होता. तर सोमवारी केवळ 1 तासात 46 मिमी पाऊस झाला होता.