भारनियमनाने सिंचन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:44 AM2018-10-21T01:44:44+5:302018-10-21T01:44:46+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे.
शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे. सध्या चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने ‘पाणी असूनही, घसा कोरडाच’ अशी दयनीय अवस्था येथील शेतकऱ्यांचीनिर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाºया बळीराजाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.
शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये कृषीपंपाच्या विजेचे मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. विशेष म्हणजे भारनियमन सोडून आलेली वीज वारंवार खंडित केली जात आहे. सलग होणाºया भारनियमनामुळे हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चालू रब्बी हंगामात उन्हाच्या काहिलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. त्यातच कांद्याच्या लागवडीही सुरू आहेत. मात्र विजेच्या समस्येमुळे मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही.
वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या भावनांचा अंत न पाहता रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन कमी करून किमान दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सलग चौदा ते सोळा तासांहून अधिक वेळ नित्याचे भारनियमन केले जात आहे. त्याचा रब्बी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होत
आहे, तर उपलब्ध विजेच्या वेळेतही वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे विद्युत पंप नादुरुस्त होऊन शेतकºयांचे आर्थिक नुकसान
होऊ लागले आहे.
खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिवसाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत रात्रीचे पीक सिंचन शेतकºयांना करावे लागत आहे.
कोयाळी, मरकळ, मोहितेवाडी, साबळेवाडी, चिंचोशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली शेतात जात आहेत.
दररोजचे वाढते भारनियमन तसेच वारंवार होत असलेल्या खंडित विजेला आम्ही पूर्णत: कंटाळलो आहोत. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. सध्या कांदा लागवडीसाठी विजेची जास्त गरज आहे. भारनियमन कमी करावे आणि तेही रात्रीचे करावे.
- संतोष आवटे, माजी सरपंच, शेलगाव.