पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची धुवांधार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 09:56 PM2020-09-10T21:56:14+5:302020-09-10T21:56:37+5:30
शुक्रवारीही शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे : दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ सुरु असतानाच रात्री उशिरा शहरात पुन्हा एकदा पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात ०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
बुधवारी दिवसभर तसेच रात्री उशिरा शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाषाण येथे ६.१ मिमी तर लोहगाव येथे ०.६ मिमी पाऊस झाला होता.
शहरात गुरुवारी सकाळी पावसाची एक जोरदार सर येऊन गेली होती. शहरात कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता.
शहराचे कमाल तापमान गुरुवारी सायंकाळी ३३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा ४.६ अंश सेल्सिअसने अधिक आहे.त्याचवेळी आर्द्रता अधिक असल्याने नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. सायंकाळनंतर आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला. रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी शहराच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती़ जोरदार वाऱ्यामुळे केशवनगर येथे एक झाड पडले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.
शुक्रवारीही शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.