घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन
By श्रीकिशन काळे | Published: July 8, 2024 04:28 PM2024-07-08T16:28:01+5:302024-07-08T16:29:20+5:30
घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास दरड कोसळण्याची शक्यता असते, म्हणून पावसाळी पर्यटन टाळावे
पुणे : गेल्या ७२ तासांमध्ये घाट माथ्यावर अतिवृष्टी होत असून, कोकण, घाट माथा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रविवारी रायगड, पाटगाव या भागामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे सध्या तरी पावसाळी पर्यटन नागरिकांनी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. पुणे व सातारा घाट विभागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गेल्या ७२ तासांत दरड प्रवण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाल्याची नोंद झाली. पावसाचे प्रमाण असेच कायम राहणार असल्याची शक्यता आहे. घाट आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांमध्ये दरडींची शक्यता वाढणार आहे. म्हणून पावसाचा जोर ओसरेपर्यंत पावसाळी पर्यटन टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या ठिकाणी रेड अलर्ट !
राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. आणखी २ ते ३ दिवस पावसाचा जोर राहणार आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, सिंधुदूर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, या जिल्ह्यातील पाटगाव धरणामध्ये रविवारी तब्ब्ल ३२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
काही भागात अलर्ट
संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि खान्देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी (दि.९) सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील रविवारचा पाऊस
कोयना : ७३ मिमी
दुधगंगा : ६८ मिमी
राधानगरी : ११५ मिमी
पाटगाव : ३२५ मिमी
कासारी : ११६ मिमी
शिरगाव : ६० मिमी
डुंगरवाडी : १०२ मिमी
कोयना : १४९ मिमी
ताम्हिणी : ११२ मिमी
भीरा : ७६ मिमी
गेल्या ३ ते ४ दिवसांपासून कोकणातील मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर येथे पाऊस होतो आहे. पण गोव्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी, तसेच रायगड जिल्ह्यातील काही भागात अधिक तीव्रतेचा पाऊस होत आहे. १२ जुलैपासून उत्तर कोकणातील जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता जाणवते. -माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे