पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यावर फिरायला जाणार असाल तर 'ही' बातमी वाचा
By श्रीकिशन काळे | Published: July 24, 2023 07:18 PM2023-07-24T19:18:15+5:302023-07-24T19:18:52+5:30
पुण्यात सरासरीच्या उणे ९६ टक्के कमी पाऊस...
पुणे : राज्यात मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. म्हणून नागरिकांनी त्या परिसरात फिरायला जाणे टाळावे, कारण जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका आहे. सध्या पावसामुळे ताम्हिणी घाट, माळशेज घाट पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. तिकडे सर्वाधिक पाऊस होत असल्याने पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ०.९ मिमी पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरात चक्रवात तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आदी परिसरावर पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या चक्रवातामुळे पुणे शहरावर २५ जुलैपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.
पुण्यात सरासरीच्या उणे ९६ मीमी कमी पाऊस
शहरात माध्य हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जूनपासून आतापर्यंत पुण्यात १९०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्याचा सरासरी पाऊस हा २८७.७ मिमी असतो. परंतु, सध्या खूप कमी पाऊस नोंदविला गेला आहे. यंदा जून महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुलैमध्ये चांगल्या पावसाची शक्यता होती. ती देखील फोल ठरली आहे.
शहरातील पाऊस
शिवाजीनगर : ०.९ मिमी
पाषाण : १.० मिमी
लोहगाव : २.८ मिमी
चिंचवड : १.० मिमी