Video: खेड-शिवापूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 11:00 PM2018-06-06T23:00:57+5:302018-06-06T23:02:48+5:30
दोन तासांच्या तुफान पावसामुळे ओढेनाल्यांना पूर
खेड-शिवापूर : बुधवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरात तर २०१३च्या आठवणी जागवल्या. पुणे-सातारा महामार्गावर दुपारी ४ च्या सुमारास वेळूफाटा व खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुमारे २ तास पावसाने हजेरी लावल्याने ओढेनाल्यांना पूर आला. महामार्गाच्या सेवा रस्त्याची अपूर्ण कामे तसेच परिसरातील डोंगरटेकड्यांच्या लचकेतोडीमुळे पावसाच्या पाण्याचे बंद झालेले नैसर्गिक प्रवाहांमुळे ही परिस्थिती ओढावली. पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
आजचा पाऊस पाहून ६ जून २०१३ रोजी झालेल्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. या वेळी आलेल्या पुरात विशाखा व संस्कृती वाडेकर या मायलेकींचा प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी अंत झाला होता. पुन्हा रखडलेल्या कामाचा आजही फटका बसल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
भोरसह पुरंदर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. नेहमी पावसाची ओढ असलेल्या पुरंदरमध्ये या वर्षी सुरुवातीलाच चांगला वर्षाव झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे दौंड, इंदापूर या तालुक्यांतही चांगला पाऊस पडला आहे.