पावसाचा धुमाकूळ: पुण्यात ४ जणांनी गमावला जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:18 PM2024-07-25T15:18:41+5:302024-07-25T15:19:50+5:30

लवासा व ताम्हिनी येथे दरड कोसळल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

Heavy rains 4 people lost their lives in Pune rescue operation on war footing | पावसाचा धुमाकूळ: पुण्यात ४ जणांनी गमावला जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

पावसाचा धुमाकूळ: पुण्यात ४ जणांनी गमावला जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

Pune Rains ( Marathi News ) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. अशातच पुण्यातील नदीपात्राच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून शहरात झालेल्या दुर्घटनांमध्ये चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात अंडा भुर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं दरड कोसल्यामुळे एका जणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुण्याजवळ असणाऱ्या लवासा इथं एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोणीही अडकले असल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. या दुर्घटनास्थळी बचावासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, बचावकार्याला वेग

पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सखल भागत पाणी साचल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. पुणे येथे उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पुरामुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी NDRF टीमला पाठिवण्यात आले असून आवश्यकता भासल्यास ARMY ला पाचारण करण्यात येईल. त्यानुसार ARMY चे मेजर जनरल  अनुराग वीज यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक तेथे त्वरीत बोटी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्त, पुणे यांना जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात उपस्थित राहून आढावा घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जवळील लवासा व ताम्हिनी येथे दरड कोसळल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना आवश्यक सुविधा भोजन व निवास याबाबतची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्याबाबतचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. धरणाचा साठा ७५ टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे सदर धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये NDRF आवश्यक साहित्यासह तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील पूर्व अनुभव विचारात घेऊन राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याकरीता बचाव कार्यासाठी SDRF व NDRF च्या टिम पूर्व तैनात करण्यात आल्या आहेत.राज्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वारंवार आढावा घेण्यात असून त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जलसंपदा विभाग, ऊर्जा विभाग इ. विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 

Web Title: Heavy rains 4 people lost their lives in Pune rescue operation on war footing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.