Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:32 PM2024-08-18T17:32:06+5:302024-08-18T17:33:00+5:30
सुट्टीच्या दिवशी अचानक पाऊस पडू लागल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, तर अनेक भागात वाहतूककोंडी
पुणे : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुण्यात जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रभर पाऊस सुरु होता. आज ढगाळ वातावरण अजिबात दिसून आले नाही. सर्वत्र ऊन पडले होते. अशातच अचानक सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासहित पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून पुणेकर घराबाहेर खरेदीसाठी पडले होते. पण चनक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. पावसाचा जोर चांगलाच होता, परिणामी अनेक रस्त्यांवर पाणी साठले.
पुण्यातील मध्यवर्ती भागाबरोबरच कात्रज, सिंहगड रोड, धायरी, कर्वेनगरम, कोथरूड, हडपसर, भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडेल असून अचानक झालेल्या पावसाने त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रविवारी (दि. १८) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात यलो अलर्ट
पुणे शहरात शनिवारी दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. तसे तर गेल्या आठवड्यापासूनच उष्णता जाणवत होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मात्र आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पुढील दोन-तीन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २१ ऑगस्ट रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट असणार आहे.
रस्ते पाण्याखाली...
पुण्यात शनिवारी सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वार घराबाहेर अडकून पडले. पावसामुळे बरेच रस्ते जलमय झाले. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली हाेती.