Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहीत मुसळधार पावसाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:09 IST2025-04-03T17:08:50+5:302025-04-03T17:09:06+5:30
पावसाच्या हजेरीने नागरिकांना अंगाची लाहीलाही करणाऱ्या असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहीत मुसळधार पावसाला सुरुवात
पुणे : उन्हाने त्रासलेल्या पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. पुण्यात गडगडाटा आणि सुसाट वाऱ्यासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच पुण्याच्या उपनगर परिसरात ढगांच्या गडगडाटासहित पाऊस पडू लागला आहे. पावसाच्या हजेरीने नागरिकांना अंगाची लाहीलाही करणाऱ्या असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात उन्हाचा तडाका वाढला होता. त्यामुळे रविवारी पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि गोंदिया या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता.
हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रीय वात सक्रिय झाली आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसास सुरुवात झाली आहे. यात हिमालयापासून पूर्वोत्तर भाग, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण भारत, असा संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा प्रभाव हा दि. ४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यामुळे तापमानात काहीशी घट होणार आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १) मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रदरम्यान चक्रीय वाताची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात ०.९ किमीवर चक्राकार वाऱ्याची ट्रफ रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये बुधवारी (दि. २) मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला होता.