धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी
By admin | Published: July 29, 2014 03:25 AM2014-07-29T03:25:58+5:302014-07-29T03:25:58+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत या प्रणालीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे २१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ८४ मिलिमीटर पाऊस टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झाला. या पावसाने या चारही धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असून, या धरणांचा पाणीसाठा आज १३ टीएमसीवर पोहोचला आहे.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी पाच या वेळेत खडकवासला धरणात १८ मिलिमीटर, पानशेत धरणात ५९ मिलिमीटर, वरसगाव ५६ मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून या चारही धरणांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला होता. त्यामुळे दिवसाआड पाणीकपात मागे घेतल्यानंतर पाऊसही बंद झाल्याने महापालिकेची चिंता वाढली होती. मात्र, पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)