पूर्व हवेलीत मुसळधार पाऊस, भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:07+5:302021-06-01T04:09:07+5:30
सोमवार (दि. ३१) रोजी दुपारी दीड वाजता अचानक जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात पावसाचे आगमन झाले. नंतर ...
सोमवार (दि. ३१) रोजी दुपारी दीड वाजता अचानक जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात पावसाचे आगमन झाले. नंतर वारे थांबले, परंतु तब्बल दीड तास जोरदार पाऊस पडला. परिसरातील झाडे व झाडांच्या फांद्या वीजपुरवठा करणार्या तारांवर पडल्याने या तारा तुटल्या. त्यामुळे पूर्व हवेलीतील बहुतेक सर्व गावांत वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा शंभर टक्के पूर्ववत होण्यासाठी वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. जोरदार पावसामुळे ओढ्याची पाणीपातळी वाढली आहे. सखल भागातील खड्ड्यांत पाणी साचले आहे. पावसामुळे ऊस, केळी यांसारखी पिके पूर्णपणे आडवी झोपली आहेत. भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. पालकसारख्या भाजीपाल्याची पाने पावसामुळे फाटून गेली. कोथिंबीर, मेथीसारख्या भाजीपाला पिकांमध्ये पाणी साठल्यामुळे ही पिके खराब होणार आहेत. जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरील नारळ व कैऱ्या खाली पडल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई शासनाकडून मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
या संदर्भात बोलताना कृषी सहायक मुक्ता गर्जे म्हणाल्या, पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारच्या निकषांनुसार पिकांचे नुकसान झाले असेल तर वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामा करून शेेेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.