गारपिटीसह मुसळधार पावसाने मंचर परिसराला झोडपून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:58+5:302021-04-28T04:11:58+5:30
सोमवारी पावसाचे वातावरण झाले होते. मात्र त्या वेळी पावसाने हुलकावणी दिली. आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाश ...
सोमवारी पावसाचे वातावरण झाले होते. मात्र त्या वेळी पावसाने हुलकावणी दिली. आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाश भरून येण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पावणेसहा वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. सुरुवातीला तुफानी गारपीट झाली. टपोऱ्या गारा पडू लागल्या. पाहता पाहता सर्वत्र गारांचा खच साचला गेला. पहिल्यांदा छोट्या गारा पडल्यानंतर मोठ्या आकाराच्या गारा पडू लागल्याने छतावर मोठा आवाज होत होता. गारांच्या तडाख्याने पिके भुईसपाट झाली आहेत. काही शेतकरी शेतात काम करत होते. पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतत असताना त्यांना गारांचा तडाखा बसला. ऊसतोडणी कामगार तसेच मेंढपाळ यांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक ऊसतोडणी कामगार भर पावसात बैलगाडीतून घरी परतत होते. अर्धा तास गारपीट झाल्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गारपीट व मुसळधार पाऊस या दोन्हीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी शेतात कांदा काढणी करत होते. तसेच उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात आली आहे. नगदी पिके काही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. त्यांना गारपिटीचा तडाखा बसला आहे.सायंकाळी बराच वेळ विजांचा कडकडाट सुरू होता.पावसाने जनावराचा चारा भिजला गेला आहे.पडणाऱ्या गारा या चहुबाजूंनी येत असल्याने गोठ्यातील जनावरांना गारांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किती नुकसान झाले याचा अंदाज उद्या येणार असून एकीकडे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे.
मंचर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने गारांचा खच पडला होता.