राज्याला पावसाचा मोठा फटका; ७६ जणांचा मृत्यू; ९० हजारांहून अधिक लोकांचे केले स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:28+5:302021-07-25T04:09:28+5:30
अजित पवार : जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार पुणे : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या ...
अजित पवार : जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार
पुणे : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पावसामुळे फटका बसला आहे. मुख्यतः जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाली आहेत. ५९ जण बेपत्ता आहेत, ७५ जनावरांचाही मृत्यू यात झाला आहे. २१ एनडीआरएफची पथक बचाव कार्य करत असून इतर १४ पथके आर्मी-नेव्हीची आहे. या सर्वांच्या एकूण ५९ बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ९० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश मिळाले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ.
राज्यातील काही भागात पुरात अडकलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी. जेवण, स्वच्छ पाणी त्यांना पुरवणे सध्या गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
-----
रायगडमधील ‘तळीये’ दरडप्रवण क्षेत्रात येत नाही
दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते. त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र, रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
-----
आमचे दुसरीकडे स्थलांतर करा
आमचे दुसरीकडे स्थलांतर करा, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील २३ गावांतील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे हे नागरिक स्थलांतर करण्याची मागणी करत आहेत.
----
पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण गावांची नावे
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड आदी सर्वांत जास्त गावांचा समावेश आहे. तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी यांचा समावेश आहे.