अतिवृष्टीचा जिल्ह्यातील अडीचलाख शेतकऱ्यांना तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 08:53 PM2019-11-11T20:53:36+5:302019-11-11T20:58:59+5:30
जिल्ह्यामधे जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले..
पुणे : पूर-अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या एकतृतीयांशहून (३७ टक्के) अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १७५० गावांमधील पिकांचे काहीना काही नुकसान झाले असून, जुन्नर, बारामती, आंबेगाव, खेड आणि पुरंदर या तालुक्यांमधे सर्वाधिक नुकसानीची नोंद झाली आहे. त्यामुळे तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बी. जी. पलघडमल यांनी दिली.
जिल्ह्यामधे जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तसेच, लांबलेल्या पावसामुळे आणि धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने बारामती, पुरंदर, शिरुर, दौंड या पर्जन्य छायेच्या तालुक्यातही खूप नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले होते.
यंदाच्या खरीप हंगामामधे ३ लाख ६ हजार ६८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर ७ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. या पुराचा तडाखा तब्बल २ लाख ४९ हजार ३७६ शेतकऱ्यांना बसला आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक २७ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल १८४ गावातील ५६ हजार ५१३ शेतकºयांना फटका बसला आहे. खालोखाल बारामती तालुक्यातील १७ हजार २९ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला आणि खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील १५ हजार ८२३ हेक्टर आणि खेडमधील १२ हजार १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर, पुरंदर तालुक्यातील ११ हजार १४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वेल्हे तालुक्यात सर्वात कमी ८०९.१२ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
-----------------------
जिल्ह्यातील नुकसान झालेले क्षेत्र
तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर)
हवेली ९६ १०,९९६ ४१७४.४९
मुळशी १४८ ४,७२२ १५४५.३१
भोर १४२ २,७१० ५४०.६४
मावळ १७८ १२,७१४ ५४३६.७९
वेल्हा १२० ४२१३ ८०९.१२
जुन्नर १८४ ५६,५१३ २७,५२३
खेड १८९ ३५,३८९ १२,१६३.७२
आंबेगाव १४२ ३२,७७४ १५,८२३.४
शिरुर ९० ७,२१७ ३९९८.४३
बारामती ११७ २९,१७३ १७,२२९
इंदापूर १४१ १४,०३३ ७४३१.३७
दौंड ९८ १५,५९४ ७९२२.०६
पुरंदर १०५ २३,३२८ ११,१४९.३७
एकूण १७५० २,४९,३७६ १,१५,७४६.७