Maharashtra Rain: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:43 PM2024-09-01T13:43:23+5:302024-09-01T13:43:34+5:30

सध्या असना वादळ आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निरमा झाल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Heavy rains in Maharashtra in September Red alert in some districts | Maharashtra Rain: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

पुणे : सध्या देशाच्या एका बाजूला असना वादळ घोंगावत असून, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य भारतात जाेरदार पावसाचा इशारा दिला असून, सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन दिवस पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती, पण आता पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

सध्या असना वादळामुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच लडाख, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.

राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, तर पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून, विदर्भ आणि कोकणातील सर्व भागातही अधिक पाऊस होऊ शकतो. त्यातही पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक राहील, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील. हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला असून, विदर्भ, कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

सध्या असना वादळ आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे मध्य भारतामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस विदर्भात, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट, तर काही भागात ऑरेंज अलर्ट असणार आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

राज्यातील शनिवारचा पाऊस

पुणे : ०.९ मिमी
सातारा : ३ मिमी
रत्नागिरी : ४ मिमी
परभणी : ६ मिमी
चंद्रपूर : २५ मिमी
यवतमाळ : ११ मिमी

Web Title: Heavy rains in Maharashtra in September Red alert in some districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.