राज्यात पावसाने जोर धरला; कोकणात २ दिवसांत मुसळधार, तर बहुतांश जिल्ह्यांत मध्यम पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:41 AM2022-06-23T09:41:41+5:302022-06-23T09:41:47+5:30
मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
पुणे : राज्यात पावसाने जोर धरला असून, येत्या दोन दिवसांत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे, तर मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवसांत राज्याच्या कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवार ते रविवार यादरम्यान मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच काळात कोकणातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या पश्चिमी वाऱ्यांमुळे विदर्भात गुरुवारी व शुक्रवारी चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
पालघर ठाणे व मुंबईत पुढील चार दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगडमध्ये शुक्रवारी व शनिवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी व बीडमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट दिला आहे. त्यानंतर हलका मध्यम पाऊस पडेल. मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
राज्यात बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये) :
कोकण : कोनकोना - १२१, देवगड ११६, पालघर ९३, मालवण ८२, राजापूर ५९
मध्य महाराष्ट्र : सोलापूर ५३, राहुरी ४२, जेऊर अमळनेर २९, गगनबावडा २४, महाबळेश्वर २०
मराठवाडा : कळमनुरी ५८, हिमायतनगर ५४, मुदखेड ४९, जिंतूर ४५, किनवट ३२
विदर्भ : गोंडपिंपरी ६०, बुलडाणा ४८, ब्रह्मपुरी ४४, सिंदेवाही ३४, देवळी ३२