मुसळधार पावसाने झोडपले, शहरात पाणीच-पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:39 PM2018-10-02T23:39:28+5:302018-10-02T23:40:22+5:30
सलग तिसऱ्या दिवशी हजेरी : सखल भागात पाणी
राजगुरुनगर : शहराला सतत तीन दिवस वादळी पावसाने झोडपले आहे. जोरदार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर गटार व्यवस्था नसल्याने आज झालेल्या जोरदार पावसाचे पाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर आल्याने नागरिकांना रस्ता शोधत जा-ये करावी लागली, तर शहरातील खोलगट परिसरातील गृह सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोराचा पाऊस झाला. गेली काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. राजगुरुनगर शहर परिसर वगळता इतर ठिकाणी पाऊस पडत होता. राजगुरुनगर शहरात पाऊस पडण्याचे वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. त्यातच शहरातील रस्त्यांवर घाण, चिखल थोड्या पावसाने होत होता. मात्र, सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते चकाचक झाले. महात्मा गांधी विद्यालयातील पटांगणात पावसाने मोठे तळे साठले होते. वाडा रस्त्यावर संगम क्लासिकजवळ पावसाचे पाणी साठवून मोठे तळे साचले होते. वादळाने अनेक ठिकाणी घरांचे गोठ्यांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले. जनावरांसाठी खाद्य केलेले कडवळ मका बाजरी ही उभी पिके शेतात आडवी झाली. नुकतीच लागवड झालेल्या कांद्याच्या शेतात पाणी साठून नुकसान झाले .ज्वारी जमीनदोस्त झाली. किवळ मळ्यातील तुकाराम वाळुंज यांच्या पत्र्याचे छप्पर उडून दोनशे फूट अंतरावर जाऊन पडले . गोठ्याचे पत्रे उडून म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हशीचा पाय तुटला . वाळुंज यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले . राक्षेवाडी परिसरात लक्ष्मण कोकणे यांच्या गोठ्याचे छप्पर उडून नुकसान झाले . सातकरस्थळ येथील साहेबराव सातकर यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने नुकसान झाले . वडगाव पाटोळे येथे अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले .नंदकुमार पाटोळे यांचे मोठे नुकसान झाले.
परिसरातील तिन्हेवाडी, सातकरस्थळ, चांडोली, पाडळी, पांगरी, बुट्टेवाडी, वडगाव पाटोळे आदी गावांच्या परिसरात झालेल्या वादळी आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली, पोल्ट्रीफार्म व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. बाजरी ज्वारीची पिके भुईसपाट झाली असून कांदे लागवडीवर परिणाम झाला.