पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 09:05 PM2019-10-22T21:05:55+5:302019-10-22T21:13:48+5:30
जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तसेच बारामती, इंदापुर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी मतदानाच्या दिशवी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडूब भरून वाहत आहे. मंगळवारी दिवसा आणि सांयकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे पुणे- नाशिक मार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. तर पुणे नगर मार्गावर कोरेगाव भीमा येथे पाणी साचल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तसेच बारामती, इंदापुर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामाला काहीसा फायदा झाला. मात्र, ज्वारी, बाजरी, मका तसेच काही पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले. काही ठिकानी रब्बीची पेरणी झाली होती. मात्र, बियाणे पाण्यात भिजल्याने शेतक-यांचे नुकसान होणार आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. याचाही फटका पिकांना झाला आहे. शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मतदानाच्या दिवशीही पावसाचे संकट होते. मात्र, दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. रात्री १० च्या सुमारास दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. मंगळवारीसुद्धा जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचले होते. ओढ्या नाल्यांनाही मोठ्या पुर आलेला. हवेली तालुक्यात लोणीकाळभोर येथे पुणे सोलापुर महामर्गावर पाणी साचल्याने महामार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू होती. पुणे- नगर मार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्याची एक बाजु पाण्याखाली गेली. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हा एका बाजुने हा मार्ग बंद करण्यात आला. एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजुची वाहतूक सुरू असल्याने पुणे नगर मार्गावर ६ ते ७ किमीपर्यंत वाहनांचया रांगा लागल्या होत्या. चाकणला सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पुणे नाशिक मार्गावर जवळपास गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे वाहतूक ढप्प झाली होती.
घोडेगाव व परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी साडेपाच ते सात दरम्यान ढगफुटी सारखा पाऊस पडला, त्यामुळे काहि काळ मंचर भीमाशंकर रस्ता घोडेगाव जवळ बंद पडला होता. कमी कालावधी मध्ये मोठा पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले.
सासवडला पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला पुर आल्यामुळे रस्ता वाहून गेला. यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. बारामती तालुक्यात क-हा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापुर बंधारे ओसंडून वाहू लागले होते. मोरगाव जवळ एका बंधा-याचा भराव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला.