Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:12 PM2024-08-07T13:12:57+5:302024-08-07T13:13:42+5:30

राज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, तर देशातही काही भागांत बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे.

Heavy rains started in the india 6 percent more than average good rains for the next 2 months | Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार

Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार

पुणे : यंदा देशभरात चांगला पाऊस झाला असून, सरासरीच्या ६ टक्के अधिक आहे. देशभर आतापर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी ४९१ मिमी पडतो. आतापर्यंत ५३३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन महिनेदेखील पावसाचे राहतील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. तर देशातही काही भागांत बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे. यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. त्यानुसार आतापर्यंत तरी सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. राज्यामध्ये गेल्या पाच दिवसांत मान्सूनची सक्रियता चांगलीच जाणवली. आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार, दि. १३ ऑगस्टपर्यंत कोकण, विदर्भ, नाशिकसह खान्देश वगळता उर्वरित नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अशा १४ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात मध्यम, तर विदर्भात जोरदार आणि मुंबईसह कोकणात अतिजोरदार पावसाची शक्यता आठवडाभर जाणवते, अशी माहिती निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल?

ऑगस्ट अखेरीस ला-निना डोकावणार आहे. या महिन्यात पाऊस सरासरीच्या कमीच राहणार आहे. नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची परिस्थिती जैसे थे असेल. विदर्भात पावसाची ओढ कायम राहील. घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस अधिक असेल. पुणे, सातारा, कोल्हापूर मधील धरणे ओसंडून वाहतील, असा अंदाज खुळे यांनी दिला.

राज्यात सप्टेंबरमध्ये पाऊस कसा असेल?

‘ला-निना’च्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात नाशिक व नगर असे दोन जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित ३४ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नाशिक, नगर जिल्ह्यात मात्र मासिक सरासरीपेक्षा केवळ कमी पावसाची शक्यता आज तरी दीर्घ पल्ल्याच्या अंदाजातील स्थितीनुसार जाणवते. अर्थात, १ सप्टेंबरला दिल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या मासिक अंदाजात अधिक स्पष्टता जाणवेल, असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पूर्व भारतात कमी पाऊस

देशात ईशान्य व पूर्व भारतामध्येच सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली.

देशातील पावसाची स्थिती (मिमीमध्ये)

(०१ जून ते ६ ऑगस्ट २०२४)
क्षेत्र : प्रत्यक्षात : सरासरी : टक्केवारी

देशभर : ५३३.३ : ५००.२ : ६.६
ईशान्य : ३१०.१ : ३३०.२ : उणे ६.१

पूर्व भारत : ७१३.९ : ८१५.५ : उणे १२.५
मध्य भारत : ६६९.७ : ५६१.३ : १९.३

दक्षिण भारत : ५०२.२ : ४०५.८ : २३.७

Web Title: Heavy rains started in the india 6 percent more than average good rains for the next 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.