पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:34 PM2021-03-22T16:34:51+5:302021-03-22T16:36:19+5:30
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा...
पुणे : पुणेकरांना वरुणराजाने सलग दुसऱ्या दिवशी उकाड्यापासून दिलासा दिला. पुणे शहराच्या पश्चिम भागात रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र, सोमवारी पुण्यातील, कर्वेनगर, विश्रांतवाडी, वारजे माळवाडी,वडगाव शेरी, कोथरूड, कॅम्प, हडपसर,बिबवेवाडी आदी उपनगरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
पुणे शहरात बदलत्या हवामानाचा परिणाम शनिवारपासूनच अनुभवायला मिळत आहे.मात्र सोमवारी सकाळपासून आकाश निळभ्र होते तसेच उन्हाचा कडाका देखील चांगलाच जाणवत होता.त्यामुळे हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरतो कि काय असे चित्र निर्माण झाले होते. परंतू दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी जमा झाली आणि काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काल अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडालेल्या पुणेकरांनी आज मात्र पावसाचा अंदाज बांधत छत्री, रेनकोट अशा तयारीनिशी घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले
रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशात ढगांची एकच गर्दी झाली आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शहराच्या विविध भागात पाऊस पडला होता. त्यात किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस होत आहे. यामुळे रविवारी शहरातील काही भागात हलक्या तर पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर अधिक तर मध्य वस्तीत शिडकावा पाहायला मिळाला होता.
पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.