लोणावळ्यात 'या' दिवशी अवजड वाहनांना बंदी; अतिक्रमणे २ दिवसात काढण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:25 PM2024-07-02T14:25:41+5:302024-07-02T14:27:00+5:30

रिक्षा, टॅक्सी, हॉटेल असो. यांनादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी बंगलो यांनीदेखील त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना माहिती देणे, त्यांची ओळखपत्र घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत....

Heavy vehicles banned in Lonavala on Friday, Saturday, Sunday; Order to remove encroachments within 2 days | लोणावळ्यात 'या' दिवशी अवजड वाहनांना बंदी; अतिक्रमणे २ दिवसात काढण्याचे आदेश

लोणावळ्यात 'या' दिवशी अवजड वाहनांना बंदी; अतिक्रमणे २ दिवसात काढण्याचे आदेश

लोणावळा (पुणे) : येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी येथे अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार व रविवारी याचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. याकरिता पोलिस यंत्रणेसोबत, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व महामार्ग पोलिस यांना सूचना दिल्या आहेत. लोणावळ्यात येण्यासाठी अनेक मार्ग असल्याने वाहतूककोंडीची समस्या जास्त आहे. मोठ्या बसला ठराविक अंतरापर्यंत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यांना पर्यटन स्थळांकडे जाण्यास बंदी असेल. रिक्षा, टॅक्सी, हॉटेल असो. यांनादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी बंगलो यांनीदेखील त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना माहिती देणे, त्यांची ओळखपत्र घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्यांची हद्द त्यांची जबाबदारी

लोणावळा शहरातील पर्यटनस्थळे हे लोणावळा नगर परिषद, वन विभाग, रेल्वे विभाग, खासगी जागा अशा विविध ठिकाणी आहेत. ज्यांच्या हद्दीत जी पर्यटन स्थळे आहेत, तेथील सुरक्षिततेची जबाबदारी त्याची आहे. लायन्स पॉइंट भागात पर्यटकांना घालून दिलेल्या वेळेनंतर पर्यटक त्या भागात थांबणार नाहीत, याची काळजी वन विभागाने घ्यायची आहे. जे अधिकारी किंवा विभाग कामचुकारपणा करतील, त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले. तसेच, सर्व ठिकाणी संयुक्त कारवाई करत पर्यटकांसाठी सूचना फलक व सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

दुर्घटना घडल्याने परिसराविषयी नकारात्मकता तयार होते

एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्या परिसराविषयी नकारात्मकता तयार होते. त्या शहराचे, पर्यटन स्थळांचे नाव खराब होते व त्याचा परिणाम तेथील पर्यटन व्यवसायावर होत असतो. याकरिता अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला एक आचारसंहिता घालून घेणे गरजेचे आहे. वाहने एक ठिकाणी उभी करून पायी फिरत येथील निसर्गाचा आनंद घ्यावा.

ड्रग्जवर कठोर कारवाई करणार

अनधिकृत व्यवसाय व ड्रग्जबाबत मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या असून, त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोठे अनधिकृतपणे ड्रग्ज विक्री केली जात असेल, तर पर्यटक लोणावळ्यात येऊन ड्रग्ज घेण्याचा प्रयत्न करत असतील, अशी माहिती मिळताच कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. तसेच, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेली अतिक्रमणे व पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे दोन दिवसांत काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Heavy vehicles banned in Lonavala on Friday, Saturday, Sunday; Order to remove encroachments within 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.