पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला उंचीची मर्यादा; मेट्रो पुलामुळे उंची २१ फूटच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 01:37 PM2022-07-24T13:37:05+5:302022-07-24T13:39:49+5:30
वनाज ते रामवाडी हा मेट्राे मार्ग संभाजी पुलावरून जात आहे
पुणे: संभाजी पुलावरील मेट्रो पुलाची उंची लक्षात घेता, या पुलाखालून विसर्जन रथ मार्गस्थ करायचा असेल, तर गणेश विसर्जन रथाची उंची २१ फुटांच्या आतच ठेवावी लागणार आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पोलिसांनी शनिवारी संभाजी पुलावरील मेट्रो पुलाची उंची मोजल्यानंतर रथाची उंची ही २१ फुटांच्या आतच ठेवावी लागणार आहे; अथवा तो रथ तेवढ्या उंचीच्या खाली फोल्डच करावा लागणार आहे.
वनाज ते रामवाडी हा मेट्राे मार्ग संभाजी पुलावरून जात आहे. या मार्गाचा आराखडा तयार करताना संभाजी पुलावरून मार्गस्थ हाेणाऱ्या विसर्जन मिरणुकीतील सहभागी रथांच्या उंचीचा विचार केला गेला नाही. या पुलाचे बांधकाम सुरू असताना गणेश मंडळांनी विरोध केला हाेता. गणेश मंडळांकडून महापालिकेत या विषयावर आंदोलनही केले होते; परंतु अखेर मेट्रो पुलाचा आराखडा बदलता येत नसल्याने हा विषय मागे पडला गेला. या काळात मेट्रो पुलाचे काम याठिकाणी पूर्ण होऊन पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे.
दरम्यान, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पुढाकाराने, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासणे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित, दत्ताभाऊ कावरे, विनायक कदम, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे संजीव जावळे, बाबा डफळ, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, संकेत मते व मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करून उंचीची मोजणी केली. यात संभाजी पुलावरील रस्ता व मेट्राेचा पूल यांच्यातील अंतर एकवीस फूट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या वर्षी राज्य सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दाेन वर्षांनंतर साजऱ्या हाेणाऱ्या या गणेशाेत्सवात विसर्जन मिरवणूकही वैशिष्ट्यपूर्ण राहणार, हे निश्चित झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विसर्जन रथ गणेश मंडळे करीत असतात.
यंदा छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रो पुलामुळे विसर्जन रथाला उंचीची मर्यादा येणार आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाची गणेशमूर्ती १४ फूट उंच असून, त्यांची विसर्जन रथावरची सजावट २५ फुटांपर्यंत जात असते; परंतु यंदाच्या वर्षी १८ फुटांवरील सजावट फोल्डिंगच्या स्वरूपात करणार असल्याचे काही गणेश मंडळांनी सांगितले आहे.