महावितरणने हद्दच केली; पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचीच वीज तोडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:32 PM2021-03-19T18:32:21+5:302021-03-19T20:49:56+5:30
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सीओईपी जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुणे : पुणे शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका प्रशासन कठोर पावले उचलत असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन सुरु आहे.त्यातच कोविड रुग्णालय सुरु करण्याच्या हालचाली सुरु असतानाच परंतु,थकीत बिल न भरल्याने महावितरणने वीज तोडली आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सीओईपी जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या सोमवार पासून हे रुग्णालय सुरु होणार होते. मात्र त्यापुर्वीच ही वीज तोडली गेली आहे. थकबाकी राहिल्याने वीज तोडली गेली आहे.
शहरात वीज बिल न भरल्याने अनेकांवर कारवाई होत आहे. थकीत वीज बिल राहिल्याने वीज तोडून अथवा मीटर काढून नेले जात आहे. महावितरणच्या तावडीतून हे जम्बो रुग्णालयही सुटले नाहीये.
मध्यंतरी जम्बो मधल्या एका विभागाची वीज फक्त तोडली गेली आहे. तिथल्या मिटर रिडींग बाबत अडचण होती. त्यामुळे हे बील भरण्यात आले नव्हते. आम्ही ही रक्कम भरुन वीज पुन्हा सुरु करुन घेवु “असे दिपाली इन्फ्राचे रोहीत छेत्री यांनी सांगितले.
महावितरणने पुण्यात जम्बो रुग्णालयाची वीज तोडली.मात्र पालिकेच्या पाणी विभागाने या कारवाईला एकप्रकारे जोरदार प्रत्युत्तर देत महावितरणच्या वसाहती आणि पाच कार्यालयांचेच पाणी तोडले. यामुळे शहरात महावितरण आणि पाणी विभागामध्ये रंगलेल्या कारवाई नाट्याची जोरदार चर्चा झाली नसती तरच नवल..
पुण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना सर्व सामान्य नागरिकांना सुलभ उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशातून पुणे महानगरपालिकेने सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर तात्काळ जम्बो कोविड रुग्णालयाची निर्मिती केली होती. मात्र, काहीच दिवसांत येथील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला होता. त्यांनतर प्रशासनाने यात सुधारणा करत पुन्हा एकदा वैद्यकीय यंत्रणा सक्षम केल्यानंतर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु झाले होते. पण दरम्यान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर महापालिका प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर बंद केले होते.
......
जम्बो कोविड सेंटरच्या वीज पुरवठ्याबाबत.
पुणे येथील उच्चदाब विजजोडणी असलेल्या जम्बो कोविड सेंटरचा किंवा अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलेला नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, सीओईपी परिसरात दिपाली डिझाईनर यांचे कार्यालय आहे. सहा लाखांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाईनर यांना देण्यात आले आहे, असे महापालिकेकडून कळविताच त्यांचा वीज पुरवठा तात्काळ जोडून देण्यात आला आहे.