अंधश्रद्धेचा कहर :रस्त्याच्या शेजारी बळी ठेवत लिंबू मिरची ठेवल्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:26 PM2019-05-02T21:26:32+5:302019-05-02T21:28:59+5:30
आधुनिक युगात आणि पुरोगामी राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला.
पुणे :आधुनिक युगात आणि पुरोगामी राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला. या प्राण्यांच्या मुंडक्या भोवती नारळ, लिंबे व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे. या प्रकारामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहे.
कोणीतरी अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेलाच हा सर्व जादू टोण्याचा प्रकार केला असून असे अघोरी कृत्य करणा-यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नंदिनी जाधव, अंधश्रद्धा निमृल समितीचे कार्याध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या वस्तीजवळ ही घटना घडली आहे त्या मुखेकर वस्तीतील जागरूक नागरिकांनी कुठलीही भीती अथवा न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
या बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास काही नागरिक शेतीला पाणी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला एका मोटारीतून आलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावर हा प्रकार करत असल्याचे त्यांना दिसले. यात काही महिला व लहान मुलगी ही असल्याचे त्यांनी सांगितले. पण खरा प्रकार सकाळी उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आला. पुरुष व महिलांच्या नावाने कपडे, नारळ, लिंबांचे हार, व इतर साहित्य तसेच पण तीन बोकडांचा बळी देऊन त्यांचे मुंडके या ठिकाणी ओळीत ठेवून त्यांना लिंबाचे हार घालण्यात आले होते.
सहा महिन्यांपूर्वीही घटला होता प्रकार
मागील सहा महिन्यापूर्वी मलठण येथे देखील जादूटोण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी प्रभोधन करून हे सर्व थोतांड असल्याचे पटवून दिले होते. तेथे जादू टोण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सर्वांसमक्ष जाळून टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना अशा अघोरी घटना घडतातच कशा ? व संबंधित यंत्रणा अशा लोकांचा बंदोबस्त का करत नाही असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केला आहे. नागरिकांनी कुठल्याही प्राकाराची भीती बाळगण्याचे कारण नाही तसेच पोलिसांनी देखील या घटनेचा छडा लावून अशा अघोरी कृत्य करणा-या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी अनिसच्या नंदिनी जाधव, तान्हाजी मुखेकर व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.