Pune Crime : चाकणमध्ये डोक्यावर कोयत्याने गंभीर वार करून निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:34 IST2022-10-11T09:31:14+5:302022-10-11T09:34:54+5:30
पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे...

Pune Crime : चाकणमध्ये डोक्यावर कोयत्याने गंभीर वार करून निर्घृण खून
चाकण (पुणे) : चाकण- रोहकल रस्त्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर आणि मानेवर गंभीर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. युसुफ अर्षद काकर ( वय.१९ वर्षे, रा.खंडोबामाळ, चाकण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसुफ काकर हा रिक्षाने रोहकल रस्त्याने जात असताना त्याच्याच रिक्षात बसलेल्या एकाने पहिल्यांदा त्याच्यावर कोयत्याने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने युसुफ हा रिक्षा सोडून पळून जाऊ लागला मात्र चाकणच्या बैलगाडा घाटात अगोदरच दबा धरून बसलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्या मागे पळत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या युसुफ काकरचा जागीच मृत्यू झाला.
मागील वर्षी चाकण मार्केटयार्ड जवळील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या जागेत झालेल्या खुनाच्या घटनेत युसुफ हा संशयित होता. त्यावरूनच हा खून झाला आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे आणि पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.