अनैतिक संबंधांच्या संशयावरून अपहरण करून तरुणाचा निर्घृण खून, इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 05:14 PM2023-12-02T17:14:50+5:302023-12-02T17:15:18+5:30
आरोपींना पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे...
इंदापूर (पुणे) : अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना पंधारवाडी (ता. इंदापूर) येथे घडली. खुनानंतर ७० किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात मृतदेह पुरून टाकण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर या खून प्रकरणास वाचा फुटली. पंधारवाडी येथे घडलेल्या प्रकरणात इंदापूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे.
गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३३), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय ३०), आकाश सुरेश शिंदे (वय २२, सर्व रा. पंधारवाडी ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. वैभव शिवाजी पारेकर (वय २६,रा. पंधारवाडी) या तरुणाचा या प्रकरणात बळी गेला आहे. त्याचे वडील शिवाजी दामू पारेकर (वय ५५, रा. पंधारवाडी) यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि.२८) नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे आपली पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करून बसले होते. दरम्यान तीनही आरोपी घरी आले. गणेश शिंदे याने घरात येऊन आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तु आमच्या सोबत चल असे वैभवला सांगितले. वैभवने आपण या तिघांबरोबर भांडगावला चाललो आहोत, असे वडिलांना सांगितले. गणेशने आणलेल्या चारचाकी वाहनातून त्या तिघांबरोबर वैभव निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून सकाळची इतर कामे उरकून फिर्यादी आरोपींच्या घरी जावून आले. तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासून घरी आले नाहीत असे त्यांच्या घरच्यांनी फिर्यादीला सांगितले.
त्यानंतर दि.३० नोव्हेंबरपर्यंत वैभवचा तपास लागला नाही. त्यामुळेच गणेशने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वैभवला गुप्तपणे अटकेत ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करून त्याचा घातपात केला असावा अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांत तक्रार केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.
खून केला इंदापुरात, मृतदेह पुरला माण तालुक्यात -
ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्या समवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने वार करून त्याला मारून टाकले होते. त्याचा मृतदेह चारचाकीच्या डिकीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी सात ते आठच्या सुमारास ते 'त्या'' चारचाकीतून थेट ७० किलोमीटर अंतर तोडून शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता. माण जि. सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारणतः दोनशे मीटर अंतरावर डोंगरदऱ्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले. नवरात्र उत्सवाच्या वेळी मृत वैभव आरोपी गणेश शिंदे याच्या घरी आला असता, गणेशने त्याला 'तु माझ्या घरी यायचे नाही, माझ्या बायकोशी बोलायचे नाही' अशी धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे अनैतिक संबंधांच्या संशयावरून हे प्रकरण घडल्याचे स्पष्ट होत आहे.