“हॅलो...अमित शहा बात करेंगे”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:39+5:302021-01-22T04:11:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘हॅलो...अमित शहा बात करेंगे.’....पंतप्रधान कार्यालयातून फोन. राष्ट्रपती भवनातून फोन... मुख्यमंत्री कार्यालयातून फोन...अशा एका मागून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘हॅलो...अमित शहा बात करेंगे.’....पंतप्रधान कार्यालयातून फोन. राष्ट्रपती भवनातून फोन... मुख्यमंत्री कार्यालयातून फोन...अशा एका मागून एक ‘हाय प्रोफाईल कॉल्स’नी गुरुवारी (दि. २१) दुपारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन सतत खणखणत राहिला. सर्वांना एकच जाणून घ्यायचे होते...आगीत कोणी दगावले तर नाही ना? आणि कोरोना लसीच्या उत्पादनाला तर धोका पोहोचला नाही ना?
अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जग थांबवणाऱ्या कोरोनावरची लस आली. लस उत्पादनात जगात महत्त्वाच्या असणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटमधे गुरुवारी (दि. २२) दुपारी आग लागल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ही आग किती भयंकर आहे, नुकसान तर झाले नाही ना, कोरोनावरील लस उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही ना, हे जाणून घेण्याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच होती. याचा दाखला गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेवढा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या थेट मोबाईलवर फोन करून वस्तुस्थितीची माहिती घेतली.
कोरोना लस उत्पादनाचे जगातले महत्वाचे केंद्र असलेल्या सिरम इन्स्टिट्युटला आग लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी भुतान आणि मालदीव या शेजारी देशांना सिरममधून मुंबईमार्गे लस पाठवली. येत्या काही दिवसांत अनेक आफ्रिकी आणि अन्य आशियाई देशांना सिरममधून लस जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आगीची घटना गंभीर मानली जाते. या मागे घातपाताचा संशय आहे का, या दृष्टीनेही चाचपणी केली जात आहे.
गुुरुवारी दुपारी पहिलाच फोन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून आला. स्वत: शहा यांनी जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांच्याकडून माहिती घेतली. हा फोन सुरूच असताना राष्ट्रपती भवनातून आणि त्याच वेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडूनही फोन आला. पाठोपाठ राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयासह, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांना उत्तरे दिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आग विझण्यापूर्वीच घटनास्थळी पोहोचले.