हॅलो आजोबा... ‘फंडा’च्या नावाखाली घातला जातोय ‘गंडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:02 AM2018-08-05T01:02:46+5:302018-08-05T01:02:50+5:30

नमस्कार, तुम्ही ......बोलताय का? मी दिल्लीच्या प्रॉव्हिडंट आॅफिसमधून बोलत आहे.

Hello grandfather ... 'Ganda' is being put under the name of 'Funda'! | हॅलो आजोबा... ‘फंडा’च्या नावाखाली घातला जातोय ‘गंडा’!

हॅलो आजोबा... ‘फंडा’च्या नावाखाली घातला जातोय ‘गंडा’!

Next

- नम्रता फडणीस 
पुणे : महिला : नमस्कार, तुम्ही ......बोलताय का? मी दिल्लीच्या प्रॉव्हिडंट आॅफिसमधून बोलत आहे.
ज्येष्ठ नागरिक : बोला.
महिला : तुमच्या वडिलांच्या नावाने काही पैसे जमा आहेत. हे पैसे तुम्ही क्लेम करणार आहात का? असाल तर, पुढच्या गोष्टी सांगते.
ज्येष्ठ नागरिक : खादीग्रामोद्योग कमिशनमधून वडील १९९१ मध्येच निवृत्त झाले आहेत, वयाच्या ६८ व्या वर्षी ते गेले. पण तेव्हा त्यांना पेंंशन नव्हती. पैसे जमा आहेत असे काही वडिलांनी सांगितले नाही (मनात विचार केला). मग म्हटले किती पैसे आहेत?
महिला : तुमच्या वडिलांचे ३ लाख ८० हजार रुपये आमच्याकडे जमा आहेत.
हा क्लेम करणार असणार तुम्हाला काही डिटेल्स देतो आणि तुम्ही आम्हाला काही कागदपत्रे पाठवायची आहेत. त्यांचा फाईल नंबर, पिन नंबर देते तो लिहून घ्या. एका विशिष्ट पत्यावर आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांक आणि ३१ हजार ६४ रुपयांचा दुसरा पाठवायचा. आम्हाला त्यावर १० टक्के व्याज बसणार आहे त्याचे हे पैसे आहेत. ते तुम्हाला रिफंड केले जातील. २२ आॅगस्टला पैसे तुमच्या खात्यावर जमा करू.
ज्येष्ठ नागरिक : पैसे चेकने पाठवायच्या ऐवजी डीडीने पाठविले तर चालतील का?
महिला : नाही, आम्हाला डीडी चालणार नाही पैसे चेकने पाठवायचे आहेत.
ज्येष्ठ नागरिक : का चालणार नाही, केंद्राचेच कार्यालय आहे ना?
असे म्हणताच महिलेने फोन बंद केला.
सेंट्रल फंड क्लेम सर्व्हिसेस (सीएफएस) च्या नावाने त्या महिलेने चेक काढायला सांगितला आणि प्रोव्हिडंट फंड रेग्युलेशन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (पीएफआरडीए) असे केंद्र शासनाच्या कार्यालयाचे नाव सांगितले, अशा प्रकारे पीएफसारख्या एका शासकीय संस्थेच्या नावाने ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, पुण्याच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
‘प्रॉव्हिडंट फंड’ हा ज्येष्ठ नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शासकीय व खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांची ही निवृत्तीनंतरची हक्काची पुंजी आहे. त्यासंदर्भात जर केंद्राच्या प्रॉव्हिडंट फंड रेग्युलेशन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (पीएफआरडीए) कडूनच अशा स्वरूपाचा फोन येत असेल तर आणि एवढी रक्कम मिळणार असेल तर त्याची नक्कीच भुरळ पडते.
आजपर्यंत बँका किंवा विविध संस्थांच्या नावाने नागरिकांना दूरध्वनी करून तुम्हाला अमूक एक रक्कम अथवा एखादे गिफ्ट मिळणार आहे, असे आमिष दाखवून एका पत्त्यावर किंवा ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून विशिष्ट रक्कम पाठवा, असे सांगण्यात येते.
या आमिषाला बळी पडून कित्येक जण त्यांनी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करतात आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. आता प्रॉव्हिडंट फंडच्या नावाने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना गंडा घालण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
पुण्याच्या पीएफ कार्यालयांकडेही अशा स्वरूपाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यांमध्येही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे पीएफ अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कोणीही दूरध्वनीवरून बँकेचा खाते क्रमांक किंवा वैयक्तिक कागदपत्रे मागत असेल तर त्याची माहिती देऊ नये. नागरिकांनी अशा भूलथापाला बळी पडू नये आणि फसवणुकीच्या प्रकारांबाबत सावध होण्याची गरज आहे.
नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला असाच फोन आला आणि त्यांनी बँकेचे संपूर्ण डिटेल्स दिले त्यानंतर त्यांचे अकाउंट रिकामे झाल्याचे पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
>पीएफ कार्यालयाकडे फसवणुकीच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेऊन पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल केल्या आहेत. काही दूरध्वनी क्रमांक टेÑस करण्याचा प्रयत्न केला; मात्र अजून शोध लागू शकलेला नाही. फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही पत्र लावण्यात आले आहे. एखाद्या गोष्टीची शहानिशा करायची असेल तर पीएफ कार्यालयाशी संपर्क साधावा.
- पीएफ अधिकारी, पुणे
>माझ्या वडिलांना पेन्शनच नव्हती आणि आयुष्याची जी काही पुंजी होती ती रक्कम ते मला देऊन गेले होते. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याची शंका आली. त्याबाबत शहानिशा केली असता फसवणुकीवर शिक्कामोर्तब झाले. पण माझ्याप्रमाणे इतरांच्या बाबतीतही हे घडू शकते त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
- ज्येष्ठ नागरिक

Web Title: Hello grandfather ... 'Ganda' is being put under the name of 'Funda'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.