हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय... सरपंचांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:41 PM2019-05-14T12:41:45+5:302019-05-14T13:06:55+5:30
आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद..
बारामती : हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय, तुमच्या गावात पाण्याची काय परिस्थिती आहे?’ दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा.
पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातीळ दुष्काळाची परिस्थिती पाहता सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर साबळेवाडी, काऱ्हाटी , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणारे प्रश्न मांडले. या वेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे; मात्र वन विभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत,’ अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉन्फरन्स कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याप्रश्नी लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सूचना केली. तसेच, साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी १५ दिवसांत संपेल; त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे,’ अशी मागणी केली. तसेच, खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काºहाटीचे सरपंच बबन जाधव यांनी ‘चारा छावणीऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा,’ अशी मागणी केली.
.......
* दोन दिवसांत मंत्रालयामध्ये बैठक होईल,
त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच, काऱ्हाटी सरपंच जाधव यांनी ‘१ जूनपर्यंत शेतकºयांना पीककर्ज मिळावे, अशी मागणी केली. दरम्यान, या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
..........
आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या ७ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पुणे जिल्ह्यात आज अखेर ५१२ विधंण विहिरीद्वारे, ५२ नळ-पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून, १० तात्पुरत्या नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून व ५७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
................
पिण्याच्या पाण्याच्या नळ-पाणीपुरवठा योजनांची ७.७५ कोटी इतकी विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ-पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण ३ शासकीय चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत. सेवाभावी संस्थांच्या २ छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये १३५ जनावरे दाखल आहेत.
............
जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ७ तालुक्यांतील ८३७ गावांतील १ लाख ७२ हजार ५५३ शेतकºयांना ६६ कोटी ४३ लाख इतकी रक्कम वाटप केलेली आहे.
.............
जिल्ह्यातील एकूण १९ हजार 39 शेतकºयांनी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी ६ कोटी ४६ लाख अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ६ कोटी ४४ लाख इतकी रक्कम ८ हजार ४१५ शेतकºयांना अदा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत २.५५ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३८ हजार शेतकºयांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण ७ कोटी ५० लाख इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याचे काम सुरू आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ७२८ कामे सुरू असून त्यावर २ हजार ६३७ मजूर उपस्थित आहेत. सर्वात जास्त ५१० मजूर इंदापूर तालुक्यात असून सर्वात कमी ३४ मजूर जुन्नर तालुक्यात आहेत. जिल्ह्यामध्ये ७ हजार ९५३ कामे शेल्फवर आहेत.
......
दुष्काळ निवारणासाठी सरपंच आणि जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचा संवाद घडवून आणणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल बारामती तालुक्यातील सरपंच नीलेश केदारी यांनी बारामती सरपंच संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
दुष्काळाच्या प्रश्नावर थेट सरपंचांशी मोबाईलवर चर्चा करून समस्या जाणून घेतल्याबद्दल आजच्या संवादादरम्यान अनेक सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
.........