हॅलो इन्स्पेक्टर : पोलिसांना पाहताच भांबावला अन् खूनप्रकरणी धागा मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 12:06 PM2024-01-02T12:06:51+5:302024-01-02T12:07:15+5:30
तो चाचपडत असल्याचे निदर्शनास आले आणि मुलाच्या खूनप्रकरणी ‘क्लू’ मिळाला....
- नारायण बडगुजर
पिंपरी : शाळेतून १५ वर्षीय मुलगा घरी न आल्याने महिलेने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार केली. मुलाचा मित्र महिलेसाेबत दिवसभर मुलाचा शोध घेण्यासाठी फिरत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी महिला पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी पोलिसांना पाहताच मुलाचा मित्र भयभीत झाला. तो चाचपडत असल्याचे निदर्शनास आले आणि मुलाच्या खूनप्रकरणी ‘क्लू’ मिळाला.
मोशी येथील महिला स्कूल बसवर मदतनीस होती. तिचा १५ वर्षीय मुलगा शाळेत जायचा. दरम्यान, त्याच्या मित्राची कबुतरांची ढाबळ होती. त्यात डुडुळगाव येथील त्यांच्या ओळखीतील एकजण येऊन गेला असल्याचा संशय मुलाला आणि त्याच्या मित्रांना होता. ज्याच्यावर संशय होता त्याच्याकडेही कबुतरांची ढाबळ होती. या संशयावरून त्याला मारण्यासाठी मुलाच्या मित्राने त्याला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून बोलावून घेतले. तो आल्यानंतर त्याला मारण्याचा कट मुलाच्या मित्राने केला. त्यासाठी त्याने सकाळपासून तयारी केली. अकराच्या सुमारास महिलेच्या १५ वर्षीय मुलासह पाच ते सात मित्र एकत्र आले. ते मोशी येथील जुना जकात नाक्याजवळच्या जंगलात गेले.
सर्वजण दारू पिऊन मोबाइलवर गाणी वाजवून नाचू लागले. १५ वर्षीय मुलाकडे सिगारेट होती. ती मित्राने त्याच्याकडे मागितली. मात्र त्याने दिली नाही. या कारणावरून दोन मित्रांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.
मित्राकडूनही दिवसभर शोधाशोध
मुलाचा खून झाला, त्यावेळी तिथे त्याचा शाळकरी मित्र होता. खून झालेल्याची आई दुपारी घरी आली. मुलगा घरी आला नसल्याने तिने शोध सुरू केला. त्यासाठी मुलाच्या मित्राला सोबत घेतले. त्या मित्रानेही महिलेसोबत दिवसभर शोधाशोध केली. मुलाचा खून झाल्याचे माहीत असतानाही त्याचा शोध घेत असल्याचे त्याने भासवले.
मित्रामुळेच पोलिस पोहोचले घटनास्थळी
दुसऱ्या दिवशी महिलेने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी भोसरी पोलिसांत नोंदवली. पाेलिसांनी तपास सुरू केला. मात्र, मुलाबाबत माहिती मिळत नव्हती. दरम्यान, महिलेसोबत असलेला मुलाचा शाळकरी मित्र पोलिस ठाण्यात आला. पोलिसांना पाहून तो भांबावला. तो चाचपडत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले. तरीही त्याने खरी माहिती दिली नाही. खून झालेला मुलगा जुन्या जकात नाक्याजवळ झाडाखाली झोपल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अल्पवयीन मित्रांनीच केला खून
पोलिसांना घटनास्थळी मृतदेह मिळून आला. पोलिसांसह मुलाच्या आईलाही मोठा धक्का बसला. शाळकरी मित्रावरील संशय बळावल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. पाच ते सहा साथीदारांनी मिळून हा खून केल्याचे मित्राने सांगितले. सर्वच जण अल्पवयीन होते.
शाळेच्या दप्तरात कोयते, खंजीर
या प्रकरणात ताब्यात घेतलेली दोन मुले शाळेत जातो, असे सांगून दप्तर घेऊन घरातून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर त्यांनी दप्तरात कोयते, खंजीर घेतले. १५ वर्षीय मुलाने सिगारेट आणि दारू घेतली होती.
मृत मुलगा १५ वर्षीय असल्याने तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने यातील अल्पवयीन मुलाला हेरले. त्याला विश्वासात घेत चौकशी केली अन् गुन्ह्याची उकल झाली.
- सचिन चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, भोसरी एमआयडीसी पोलिस, ठाणे