'नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र', हे शब्द ऐकणाऱ्यांची निराशा; आकाशवाणीतील वृत्त विभाग बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:17 AM2023-06-14T10:17:33+5:302023-06-14T10:18:14+5:30
महाराष्ट्र तसेच देशातील महत्त्वपूर्ण घडामोडी आकाशवाणीवरून ऐकवल्या जात होत्या
पुणे : ‘नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत,’ हे शब्द कानावर पडताच प्रादेशिक बातम्या ऐकणाऱ्या कानसेनांची आता निराशा होणार आहे. कारण आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होत आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका आदेशानुसार, पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे भरली जात नसल्याने येथील वृत्त विभाग बंद होणार आहे.
कित्येक वर्षांपासून पुणे आकाशवाणीवरून बातम्या ऐकल्या जात होत्या. सध्याच्या सोशल मीडिया, चॅनेलच्या जमान्यातही आकाशवाणीवरील बातम्या ऐकणारे श्रोते टिकून होते. त्यामुळे त्या सर्वांची निराशा होणार आहे. पुणे आकाशवाणीवरून नागरिकांना सकाळी ७:१० च्या बातम्या ऐकविल्या जात होत्या. राज्यात १ मे १९७५ पासून मराठी बातम्यांचे प्रसारण पुण्यातील प्रादेशिक वृत्त युनिटकडून केले जात होते. सध्या एक वृत्त उपसंचालक आणि एक वृत्त संपादक याशिवाय दहा-बारा पत्रकार कंत्राटी पद्धतीने काम करतात.
वृत्त संपादक आणि वृत्त उपसंचालक हे दैनंदिन बातम्यांच्या निर्मितीसाठी जबाबदार असतात. तीच पदे रिक्त आहेत. आकाशवाणी पुणेचे दिवसाचे पहिले प्रसारण सकाळी ७:१० वाजता होते. या विभागातील बातम्या प्रामुख्याने महाराष्ट्रात काय घडत आहे तसेच देशाच्या इतर भागांमध्ये घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींशी संबंधित असतात. याच बातम्या आता छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होणार आहेत; परंतु, छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाचा कार्यभारही मुंबईतल्या माहिती सेवा अधिकाऱ्याकडे अतिरिक्त दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या बातम्यांबाबत सर्वच अधांतरी आहे.
या विशेष कार्यक्रमांचे काय?
१९ जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र औरंगाबाद वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तसेच या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रमदेखील आता बंद होणार आहेत.