हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 12:02 PM2021-01-11T12:02:18+5:302021-01-11T12:02:49+5:30

पोलिसांच्या सायबर विभागाकडून सावध राहण्याचे आवाहन..

Hello ... will you give a massage to a high profile woman? New racket of youth online fraud | हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

Next
ठळक मुद्देआंतरराज्य रॅकेटकडून फसवणूक : फ्रेंडशिप क्लबच्या मेंबरशिपसाठी घेतले जातात पैसे

नारायण बडगुजर-
पिंपरी : हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का, त्यांचे समाधान कराल का... असे विचारून फोनवरून तरुणांच्या भावना चाळविण्याचा प्रकार केला जात आहे. त्यातून हायप्रोफाईल फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास सांगून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यात आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असून, तरुणांसह वयस्क पुरुषांनाही गंडा घालण्यात येत आहे. 
 
ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन पोलिसांच्या सायबर विभागाकडून केले जाते. असे असतानाही अनेक नागरिक वैयक्तिक माहिती शेअर करतात. सायबर चोरटे त्याचा गैरवापर करून फसवणूक करतात. असेच काही आंतरराज्यीय रॅकेट सक्रीय आहे. दिल्ली, तसेच बांगलादेशच्या सीमावर्ती परिसरातून काॅल सेंटरप्रमाणे त्यांचे कामकाज होते. महिला तसेच तरुणींना विविध राज्यांतील फोन क्रमांक दिले जातात. त्यावर संबंधित तरुणी किंवा महिला संपर्क साधातात.

सुरवातीला हिंदीतून मधूर संवाद साधला जातो. समोरची व्यक्ती मराठीतून बोलत असल्यास काही वाक्य किंवा शब्द मराठीतून बोलून त्यांची नाव, कामाचे ठिकाण, कामाचे स्वरुप आदि माहिती विचारण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. त्यानंतर त्यांना पैशांची गरज आहे का, असे विचारून हायप्रोफाईल महिलेचा मसाज कराल का, त्यांचे समाधान कराल का, त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील, असे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास मिटिंग करण्याबाबत किंवा अपाॅईंटमेंट कधीची चालेल असे विचारले जाते. तसेच कोणत्या भागातील हायप्रोफाईल महिला क्लाएंट उपलब्ध होऊ शकेल, याची माहिती दिली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा फोन करणाऱ्या तरुणीवर विश्वास बसतो. हायप्रोफाईल महिलेसोबत अपाॅईंटमेंट करून तिच्याकडूनच चांगले पैसे मिळणार, या विचाराने त्या व्यक्तीच्या भावना चाळवतात. याचाच गैरफायदा घेऊन फोनवरून संबंधित तरुणी त्यांच्या फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास सांगते. त्यासाठी काही पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला किंवा बॅंकेच्या खात्यावर भरायला सांगते. पैसे दिल्यानंतर काॅल सेंटरमधील तरुणीचा फोन बंद होतो. फसवणूक झाल्याचे संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास येते. मात्र पैसे आणि वेळही निघून गेलेली असते.

रॅकेटचा होत नाही पर्दाफाश
फसवणुकीच्या अशा प्रकरणांमध्ये आंतरराज्य रॅकेट सक्रीय असून त्यांच्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येतात. संबंधित रॅकेटचे कामकाज सुरू असलेले नेमके ठिकाण शोधून काढणे शक्य होत नाही. तसेच बनावट नावे, बॅंक खाते, सिमकार्ड हे सातत्याने बदलत असल्याने ते ‘ट्रेस’ करता येत नाहीत. संबंधित बॅंक, टेलिकाॅम कंपनी, इंटरनेट आदी यंत्रणांकडून त्याबाबत माहिती दिली जात नाही. परिणामी अशा रॅकेटचा पर्दाफाश होत नाही.

ना हाक ना बोंब...
अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्ती तक्रार करण्यात पुढे येत नाहीत. समाजातील  प्रतिष्ठा, पत्नी, कुटुंबियांचा दबाव अशा एक ना अनेक कारणांमुळे संबंधित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करीत नाही. परिणामी गुन्हे घडूनही त्याबाबत ‘ना हाक ना बोंब’, अशी परिस्थिती असते. 

सायबर चोरटे संबंधित व्यक्तीच्या भावनांशी खेळतात. प्रलोभने देऊन मोहात पाडतात. त्याला अनेक जण बळी पडतात. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक होते. सतर्कता हाच त्यावर उपाय आहे. 
- डाॅ. संजय तुंगार, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: Hello ... will you give a massage to a high profile woman? New racket of youth online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.