हेल्मेटसक्ती हिंजवडीत झाली, शहरात का नाही?

By admin | Published: April 15, 2016 03:25 AM2016-04-15T03:25:55+5:302016-04-15T03:25:55+5:30

शहरात हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष केले जात असले तरी; जीव वाचविणाऱ्या हेल्मेटचे महत्व आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यां तरूणांनी अधोरेखीत केले आहे. हिंजवडी परिसरातील

Helmatsutti is in Hinjawadi, why not in the city? | हेल्मेटसक्ती हिंजवडीत झाली, शहरात का नाही?

हेल्मेटसक्ती हिंजवडीत झाली, शहरात का नाही?

Next

पुणे : शहरात हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष केले जात असले तरी; जीव वाचविणाऱ्या हेल्मेटचे महत्व आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यां तरूणांनी अधोरेखीत केले आहे. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांनी दुचाकीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे केल्याने सर्वाधिक हेल्मेट वापर करणारा दुचाकीचालकांचा परिसर म्हणून हा भाग ओळखला जात आहे. तर या परिसरात अपघातांमध्ये गंभीर जखमी होणाऱ्या दुचाकीचालकांचे प्रमाणही हेल्मेट मुळे अत्यल्प असल्याचे समोर आहे.
विशेष म्हणजे पोलिसांच्या माहितीनुसार या परिसरात दहा चालकांमागे सुमारे ८ चालक हेल्मेट वापरतात. तर शहरात हेच चित्र नेमके उलटे असून १० दुचाकीस्वारांमागे केवळ दोनच चालक हेल्मेट वापरताना आढळून येतात. त्यामुळे जर खासगी कंपन्यांनी केलेली हेल्मेट सक्ती लक्षात घेऊन महाविद्यालये आणि शासकीय कर्मचारी तसेच खासगी आस्थापनांनीही कायद्यासाठी नव्हे तर सुरक्षिततेसाठी हेल्मेट बंधनकारक केल्यास शेकडो जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

हिंजवडीत अंमलबजावणी
गेल्या दशकभरात जगभरातील माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी पुण्यास पसंती दिल्याने आयटी सिटी म्हणून पुणे नावारूपास आले आहे. प्रामुख्याने हिंजवडी परिसरात या कंपन्या असून मोठया प्रमाणात युवा वर्ग या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करतो. या कंपन्यांनी वाहतूकीसाठी चारचाकी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली असली तरी अनेक कर्मचारी दुचाकीचा वापर करतात.
या कर्मचाऱ्यांना हेल्मेट शिवाय कंपनीत प्रवेश दिलाच जात नाही. त्यांनी सक्ती नसली सुरक्षेचा भाग म्हणून हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. अशा अनेक कंपन्यांनी हे धोरण अवलंबविले असून त्यात लहान मोठया कंपन्यांचा समावेश आहे. हिंजवडी प्रमाणेच शहरातही अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केलेली आहे. मात्र, त्यानंतरही शिक्षण घेणारे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांची मोठी संख्या आहे जे दुचाकीचा वापरतात़
या आस्थापनांनीही प्रवासाकरता हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती आणि सक्ती केल्यास शहरात जवळपास ६० टक्के दुचाकीचालकांना सहज हेल्मेटचे कवच मिळेल असे वाहतूक पोलिसांचे मत आहे. तर शहरात अनेक ठिकाणी लष्कराच्या हददीत (कँन्टोन्मेंट) मध्ये हेल्मेटची सक्ती असून नागरिकही या परिसरात जाताना हेल्मेट वापरताना दिसतात. तर पुणे विद्यापीठानेही महाविद्यालयांमध्ये दुचाकीवर येणाऱ्यांंसाठी हेल्मेट सक्ती केली आहे.

हेल्मेट वापराबाबत होणार पुणेकरांचे प्रबोधन : पोलीस आयुक्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही. परंतु हेल्मेट वापराबाबत आपण नागरिकांचे ‘प्रबोधन’ करणार असल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्पष्ट केले. यासोबतच पुण्याची वाहतूक समस्या गंभीर बनली असून ही समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालधक्का चौक ते आरटीओ चौक, पुणे विद्यापीठ चौक आणि अभियांत्रिकी चौक या रस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Helmatsutti is in Hinjawadi, why not in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.