हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात हेल्मेट दिवस; शासकीय कार्यालयाबाहेर जनजागृती आणि कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 11:52 PM2023-05-23T23:52:29+5:302023-05-23T23:53:46+5:30
बुधवारी २४ मे रोजी पुण्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे.
पुणे : रस्त्यावर जागोजागी उभे राहून दुचाकीस्वारांना चौकात अडवून वाहतूक पोलीस हेल्मेटसक्तीची कारवाई करत असत. त्याला पुण्यात विरोध झाल्याने आता चौकातील कारवाई बंद झाली. फक्त सीसीटीव्हीद्वारे सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात आहे. बुधवारी २४ मे रोजी पुण्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणार्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावरील वाढत्या अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी २४ मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व प्रथम सर्व शासकीय कार्यालयात येणार्या अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात येईल. तसेच विना हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या असलेल्या वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शासकीय कार्यालयाच्या परिसरात नेमणूक करण्यात आली आहे.