हेल्मेट आवश्यकच, पण सक्ती नको

By admin | Published: April 16, 2016 04:01 AM2016-04-16T04:01:05+5:302016-04-16T04:01:05+5:30

दुचाकीचालकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट ही आवश्यक बाब आहे. मात्र, त्याची सक्ती करण्यापेक्षा ही दैनंदिन वापराची गरज आहे, ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे.

Helmets are not necessary, but they're not forced | हेल्मेट आवश्यकच, पण सक्ती नको

हेल्मेट आवश्यकच, पण सक्ती नको

Next

पुणे : दुचाकीचालकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट ही आवश्यक बाब आहे. मात्र, त्याची सक्ती करण्यापेक्षा ही दैनंदिन वापराची गरज आहे, ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आधी प्रबोधन आणि प्रत्यक्ष हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रश्न सोडविणे आवश्यक असल्याची भूमिका शहरातील स्वयंसेवी संस्थांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.

पोलिसांचा प्राधान्यक्रम जनजागृतीलाच
हेल्मेट हे कायद्याने बंधनकारक आहे. वेळोवेळी या हेल्मेटसक्तीला विरोध केला जात आहे. मात्र ही सक्ती नाही तर कायद्याची अंमलबजावणी आहे. तसेच शहरातील वाहने, रस्ते आणि अपघातांची स्थिती पाहता हेल्मेट न वापरल्याने होणारे अपघात रोखण्यासाठीच शहरात ही कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरातील कारवाई पाहता हेल्मेटबाबत केलेली कारवाई चौथ्या क्रमांकाची आहे. सर्वाधिक कारवाई नो एन्ट्री, सिग्नल तोडणे आणि लेन कटिंगची आहे. हेल्मेट हा सक्तीबरोबरच वैयक्तिक सुरक्षेचाही भाग आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण वर्षभर वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. तसेच दर महिन्याला ५०० हून अधिक हेल्मेट मोफत वाटली जात आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालये तसेच व्याख्यानांमधूनही हे प्रबोधन केले जात आहे. ही वस्तुस्थिती आहे, की ५० टक्के वाहतूक पोलीस हेल्मेट वापरत नाहीत. मात्र, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केलेली आहे. कोणताही अपघात होताना, तो पोलीस आहे की सर्वसामान्य नागरिक हे पाहत नाही. त्यामुळे हेल्मेट न वापरणाऱ्यालाही गंभीर जखम अथवा मृत्यूचा सामना करावा लागणारच आहे.
- सारंग आवाड, (वाहतूक पोलीस उपायुक्त)

हेल्मेट हा एकच गुन्हा ही वृत्ती चुकीची
वाहनचालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यकच आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना; शहरातील वाहनचालक केवळ हेल्मेट न वापरता सर्वात मोठा गुन्हा आहे अशा स्वरूपात ही सक्ती केली जात आहे. प्रत्यक्षात शहरातील अपघात वाढण्यामागे हेल्मेट हे एकमेव कारण नाही. वाहन चालविताना केल्या जाणाऱ्या चुका अथवा गुन्ह्यांमध्ये सीटबेल्ट आणि हेल्मेट हे क दर्जाचे गुन्हे आहेत. त्याआधी सिग्नल तोडणे, नो एंट्री, लेन कटिंग, वेगाने वाहन चालविणे हे गुन्हे आहेत. यामुळेच अपघात मोठ्या प्रमाणावर घडतात. आधी अशा घटनांना पायबंद घातल्यास अपघातांची संख्या आपोआपच घटेल. पोलिसांच्या दृष्टीने हेल्मेट न घातलेला दुचाकीचालक हा अतिशय सोपे टार्गेट आहे. असा चालक लांबूनच दिसतो. ही जर सक्ती आहे तर पोलिसांनी आधी स्वत:पासून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. त्यानंतर इतरांना सक्ती करावी. मात्र, सक्तीच्या नावाखाली हेल्मेटबाबत इतर घटकांकडे दुर्लक्ष करून केवळ वसुली हा एकमेव उद्देश असू नये. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध आहे.
- विवेक वेलणकर
(सजग नागरिक मंच )

कायदे पाळण्यासाठी, मोडण्यासाठी नाही
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहनांची संख्या आणि कायदा धुडकावून वाहन चालविणारे वाहनचालक पाहता शहरात हेल्मेटची नितांत गरज आहे. मात्र, कायदा हा पाळण्यासाठी नसतो तर मोडण्यासाठी असतो, अशी मानसिकता ठेवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालण्याची प्रवृत्ती योग्य नाही. त्यामुळे कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरणे हे सर्वांची भूमिका असली पाहिजे. मात्र, त्यासाठी सक्ती करण्यापेक्षा त्याचे महत्त्व समजावून देऊन तसेच वेळप्रसंगी त्याबाबत असलेल्या शंकांचे समाधान करून ही गरज सर्वांच्या निदर्शनास आणून देणेही आवश्यक आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यास विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही.
- जुगल राठी
(पीएमपी प्रवासी मंच)

तर हेल्मेट जीवनावश्यक बाब म्हणून घोषित करा
हेल्मेट ही वैयक्तिक सुरक्षेची बाब आहे. मात्र, त्यासाठी सक्ती करताना इतर बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही वैयक्तिक सक्ती करण्यात येत असेल तर, त्याला जीवनावश्यक बाब म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. मग जीवनावश्यक बाबीसाठी आवश्यक असलेले निकषही हेल्मेटला लावणे गरजेचे आहेत. शहरात सक्ती केल्यास तेवढी हेल्मेट उपलब्ध आहेत का, गाडीवर लहान मूल असेल तर त्याला हेल्मेट बंधनकारक आहे का, हेल्मेट घातल्याने ज्येष्ठ नागरिकांना काही त्रास होतात का, हेल्मेटची गुणवत्ता काय आहे, हेल्मेट घातल्यानंतरही मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न प्रत्येक वेळी हेल्मेटसक्तीला विरोध केल्यानंतर उपस्थित केले जातात. मात्र, केवळ सक्ती आणि दंडवसुली यापलीकडे या प्रश्नांचे कोणतेही उत्तर सर्वसामान्यांना दिले जात नाही. तसेच यापलीकडे कोणतीही जबाबदारी शासनाकडून स्वीकारली जात नाही. या घटकांचा विचार करून तसेच त्याबाबत असलेल्या शंकांचे समाधान करून हा निर्णय घेणे संयुक्तिक ठरेल.
- प्रशांत इनामदार
(पादचारी प्रथम संस्था)

कायद्याची अंमलबजावणी हे कर्तव्य
हेल्मेट हे मुळातच दुचाकीचालकांच्या सुरक्षेसाठी आहे. शहरातील वाहतुकीची स्थिती एवढी वाईट आहे, की सायकलस्वारांनाही हेल्मेट आवश्यक असल्याचे चित्र आहे. शहरात अपघातांचे प्रमाण जास्त नाही. ते घातल्याने अपघात घटणार आहेत का, असे प्रश्न उपस्थित न करता कायद्याने बंधनकारक असलेले आणि वारंवार न्यायालयानेही सूचना देऊन सक्ती केलेले हेल्मेट वापरणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. ते वापरले नाही तर समाज अथवा चालकांव्यतिरिक्त कोणाचे नुकसान होणार नाही. पण हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास संपूर्ण आयुष्य तसेच चालकावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची मोठी हानी होते. त्यामुळे सक्ती करू नये, ही भूमिकाच चुकीचीच आहे. हेल्मेट बंधनकारक असणेच आवश्यक आहे.
- रणजित गाडगीळ (परिसर)

संस्थांचे आक्षेप मान्य असून हेल्मेटसक्ती न होता तो सवयीचा भाग व्हावा, या उद्देशाने शहरात हेल्मेट जनजागृतीपर व्याखाने, प्रबोधनात्मक उपक्रम राबवून हेल्मेट वापरास प्रोत्साहन दिले जात असल्याची भूमिका स्वीकारण्यात आली असून प्रशासन आणि लोकसहभागातून ही सुरक्षेची चळवळ लोकमतच्या माध्यमातून पुढे नेण्याचा निर्धार या घटकांनी व्यक्त केला आहे. तर हेल्मेटच्या जनजागृतीबाबत ‘लोकमत’मधून घेण्यात आलेल्या या पुढाकाराचे कौतुकही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात फक्त पुण्यातच हेल्मेट सक्तीची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते. इतर शहरामध्ये तशी स्थिती नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
 

 

Web Title: Helmets are not necessary, but they're not forced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.