मदत मिळू लागली, पण कामगार गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:11+5:302021-05-12T04:12:11+5:30
पुणे : राज्य शासनाने देऊ केलेली दीड हजार रुपयांची मदत बांधकाम मजुरांना मिळण्यास पुण्यात मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, ...
पुणे : राज्य शासनाने देऊ केलेली दीड हजार रुपयांची मदत बांधकाम मजुरांना मिळण्यास पुण्यात मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, पुण्यातील नोंदणीकृत बांधकाम मजुरांपैकी बहुतांश मजूर आपापल्या गावी परतल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोचविण्यात अडथळे येत आहेत.
पुण्यामध्ये जवळपास ५० हजार बांधकाम मजुरांची नोंदणी झालेली आहे. या कामगारांना दर वर्षी त्यांची नोंदणी (रिन्युअल) पुन्हा करावी लागते. राज्यात कडक संचारबंदी लागू करण्याच्या आधीच बरेचसे मजूर आपापल्या गावी परतले आहेत. तर, बरेचसे मजूर बांधकाम साईट सोडून अन्यत्र असलेल्या साईटवर कामासाठी गेलेले आहेत. त्यामुळे या कामगारांचा शोध घेऊन त्यांची पुन्हा नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत.
पुण्यातील बांधकाम मजुरांना मदत मिळण्यास सुरुवात झाली असून क्रेडाईकडून शासनाची मदत मजुरांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे मजूर पुण्यात आहेत किंवा ज्यांची पुनर्नोंदणी झालेली आहे अशा मजुरांना मदतीचा हात मिळत असल्याचे क्रेडाईकडून सांगण्यात आले. यासोबतच बांधकाम मजुरांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
-----
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांची संख्या - साधारण ५० हजार
नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - अंदाजे २० हजार
----
सांगा जगायचे कसे?
मला वर्षभरापासून काम नाही. अधूनमधून कामे मिळत होती. पण, त्यामधून कुटुंब जगवणे अवघड आहे. शासनाने दिलेली दीड हजाराची मदत संसाराला पुरणार कशी? रोजचे खर्च, लाईट बिल असे खर्च काही चुकत नाहीत.
- मुत्ताप्पा येळसंगी, गुलटेकडी
----
माझ्या घरात आठ माणसं आहेत. माझ्या एकट्यावर घर चालतं. मला शासनाची मदत काही मिळालेली नाही. दीड हजार रुपयांची मदत कधी मिळणार, त्याचा लाभ कधी मिळणार? मला कोणीही संपर्क केलेला नाही. माहिती घ्यायला जावे तर पोलीस रस्त्यात अडवतात. कोणाकडे जाऊन चौकशी करावी हे समजत नाही.
- बाळू बनसोडे, हडपसर
----
मी गवंडी काम करतो. माझी नावनोंदणी झालेली नाही. त्यामुळे मला मदत मिळणार का नाही हा प्रश्न आहे. दीड हजारात रेशनपाणी तर घरात येईल. पण, ते सुद्धा शक्य होईल असं वाटत नाही.
- सुनील शिंदे, दांडेकर पूल
-----
शासनाची मदत मिळायला सुरुवात झाली आहे. बहुतांश मजूर आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे कामगारांच्या पुनर्नोंदणीचे काम झालेले नाही. त्यामुळे मदत पोचण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करीत आहोत. कामगारांच्या नोंदणी आणि मदतीसाठी समन्वय साधण्यात येत आहे. यासोबतच आम्ही त्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यावर भर देत आहोत.
- दिवाकर अभ्यंकर, सीईओ, क्रेडाई